पिंपरी चिंचवड : शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला असून त्यांनी गेल्या नऊ वर्षात काय विकास कामे केली आहेत, ती अगोदर समोर ठेवावीत आणि मग निवडणुकीला सामोरे जावे असे थेट आव्हान त्यांनी केले आहे. तर, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात यावी, ते निश्चित निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढील पेच आणखी वाढला आहे.
हेही वाचा : पुणे सायबर फ्रॉड! सोशल मीडियावर पोस्ट लाइक करताच बसला २० लाखांचा फटका; जाणून घ्या काय आहे प्रकरण….
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष मावळ लोकसभा मतदार संघावर आहे. राज्यामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात महायुती आहे. परंतु, या महायुतीचा धर्म केवळ अजित पवार गटानेच पाळायचा का? असा प्रश्न उपस्थित करत सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. श्रीरंग बारणे यांनी गेल्या नऊ वर्षांत मावळ लोकसभा मतदारसंघात काय काम केले आहे? यासंबंधी त्यांनी उत्तर द्यावं, असं म्हटलं आहे. मावळ लोकसभा उमेदवारीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे. दुसरीकडे पिंपरी विधानसभा अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी देखील पार्थ पवारसाठी ‘ती’ जागा सोडण्यात यावी असं म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी या अगोदर देखील मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती. आता त्यांना अधिक अनुभव असून त्यांनी निवडणूक लढवल्यास ते निश्चितच निवडून येतील, असा विश्वास आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार गटाच्या दोन्ही आमदारांच्या वक्तव्यांमुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. यामुळे महायुतीत उमेदवारीवरून काही बदल होतात का? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.