पिंपरी : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त एक या पदावर रेल्वे, वस्तू व सेवा कर विभाग आणि मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊ लागल्याने प्रशासनाने आता भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी (आयएएस) अधिकाऱ्याचीच अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्ती करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नगरविकास विभागाला पत्र पाठविले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन आकृतीबंधानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली. यापूर्वी महसूल सेवेतील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती होत होती, परंतु मागील काही वर्षांत रेल्वे सेवेतील विकास ढाकणे, राज्य वस्तू व कर सेवेतील प्रदीप जांभळे, मुख्याधिकारी संवर्गातील स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली. जांभळे यांची महाराष्ट्र प्रशासकीय लवादने (मॅट) नियुक्ती रद्द केली आहे. त्यांच्या जागी झगडे यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाला दिले. पण, जांभळे यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपदाचा वाद काही केल्या संपुष्टात येत नाही. अतिरिक्त आयुक्त एक पदाच्या सुरू असलेल्या वादावरून महापालिकेची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे.

हेही वाचा – “भाजपासह गद्दारांना धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या”, आदित्य ठाकरेंचे आवाहन

यापार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी २८ डिसेंबर २०२२ रोजी महापालिका अतिरिक्त आयुक्त एक या पदावर प्रतिनियुक्तीने राज्य शासनाकडून वेळोवेळी नेमणूक करण्यात येईल, असा अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील असावा. तसेच अतिरिक्त आयुक्त दोन या पदावर शासनाचे सह सचिव, उपसचिव दर्जाचे, मुख्य अधिकारी (निवडश्रेणी) किंवा समकक्ष वेतनश्रेणीतील अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल. अतिरिक्त आयुक्त तीन या पदावर स्थानिक अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने नियुक्ती करता येईल. याप्रमाणे नव्याने पद निर्मिती करून अतिरिक्त आयुक्त पदाचे नेमणूक अर्हता व वेतनश्रेणी दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे परवानगी मागितली. त्यावर शासनाने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी महापालिकेला पत्र पाठवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगतिले. त्यानुसार महापालिका आवश्यक कागदपत्रांसह पुन्हा प्रस्ताव शासनाला पाठविणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त एक या पदावर सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती होवू शकते.

हेही वाचा – स्वदेशी प्रजातीचे देखणे अश्व पाहण्याची संधी, पुण्यात शनिवारपासून दोन दिवस ‘मारवाडी हॉर्स शो’

महापालिकेत दोन मुख्य अभियंता

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अभियांत्रिकी विभागाच्या आकृतीबंधामध्ये मुख्य अभियंत्याची दोन पदे निर्माण केली जाणार आहेत. शहर अभियंता या पदाला समकक्ष ही पदे असतील. या पदांची व संवर्गाची अर्हता, सेवाप्रवेश, नियम, वेतनश्रेणीस मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. त्यावर शासनाने पदनिर्मिती व वेतनश्रेणी बदलामुळे महापालिकेवर पडणारा आर्थिक खर्चाचा तपशील, मुख्य अभियंता पदाची आवश्यकता, त्याबाबतचे निकष, कर्तव्य जबाबदाऱ्याचा तपशील याची माहिती मागविली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri mnc commissioner letter to state govt regarding appointment of ias officer as additional commissioner of pimpri mnc pune print news spt 17 ssb