पिंपरी : महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांची दिव्याची गाडी आली. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून महापालिका शाळेतील दोन विद्यार्थी उतरले. त्यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वार तसेच आयुक्त कार्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सॅल्युट केले. हे दृश्य होतं आज सोमवारी महापालिका आयुक्तांची भूमिका बजावणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागताचे. त्यामध्ये एका मुलीचाही समावेश होता. महापालिकेला आतापर्यंत एकदाही महिला आयुक्त लाभल्या नाहीत. शिक्षक दिनानिमित्ताने महिला आयुक्त मिळाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने सोमवारी वेगळा उपक्रम राबविला. आयुक्त शेखर सिंह हे शिक्षक तर महापालिकेच्या भोसरी येथील इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेतील इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी करण काकडे आणि काळेवाडी येथील दत्तोबा रामचंद्र काळे शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अपेक्षा माळी या दोघांनी महापालिका आयुक्तांची भूमिका केली. यावेळी त्यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठकदेखील घेऊन सूचना केल्या. बैठकीस सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
हेही वाचा – पुणे: संभाजी भिडेंसह १५० जणांविरुद्ध गुन्हा; परवानगी नाकारल्यानंतरही सभा
यानंतर दोन्ही विद्यार्थी आयुक्तांनी संत तुकाराम नगर येथील अग्निशमन केंद्राला भेट देऊन तेथील कामकाज कसे चालते, अग्निशमन विभागाची जनतेला कशी मदत मिळते याबाबत प्रात्याक्षिक पाहिले, तसेच तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. एकीकडे विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्त म्हणून भूमिका केली तर दुसरीकडे आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षकाची भूमिका पार पाडली.
हेही वाचा – पुणे: संभाजी भिडेंसह १५० जणांविरुद्ध गुन्हा; परवानगी नाकारल्यानंतरही सभा
या अनुभवाबाबत बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘जॉब स्विच’ या उपक्रमाअंतर्गत मी आज एका शिक्षकाची भूमिका पार पाडली. तर, विद्यार्थ्यांनी माझ्या कार्यालयात जाऊन आयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली. महापालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेत शिकवत असताना मी चांद्रयानाबद्दल माहिती दिली. विद्यार्थी भविष्यात इस्रोचा एक भाग कसे बनू शकतात आणि वैमानिक अभियंता कसे होऊ शकतात याबद्दल त्यांनी मला प्रश्न विचारले. विशेषतः मुलींना हे करिअर स्वीकारण्याची आवड आहे हे पाहून मला आनंद वाटला. आकांशा शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी माझे शिक्षण, छंद, आवडते शिक्षक यांसारखे काही वैयक्तिक प्रश्न विचारले. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना मला खूप आनंद झाला असे सांगून या अनुभवाने मलाही विचार करण्यासारखे काही प्रश्न जाणवले जेणेकरून शहरातील एकूण शिक्षण पद्धतीत काय बदल करता येतील याबाबत मला काही कल्पना सूचल्या आहेत.