महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याच पध्दतीने दोन लोकसभा व तीन विधानसभा मतदारसंघाशी संबंध असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक व्हावी, असा सूर पक्षातून व्यक्त होत आहे. मागील निवडणुकांमध्ये मनसेचे उमेदवार रिंगणात नसल्याचा फायदा अन्य राजकीय पक्षांना झाला होता, त्यामुळे आतापासूनच निवडणुकीचे नियोजन होणे गरजेचे आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
पुणे शहरातील मनसेच्या कामगिरीचा राज ठाकरे यांनी काल आढावा घेतला. आगामी लोकसभा निवडणूक, नगरसेवकांची कामगिरी, पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यक्रम आदींविषयी ठाकरेंनी मार्गदर्शन केले. पुण्याची लोकसभेची जागाजिंकण्याची सोन्यासारखी संधी आहे, असे सांगतानाच आठ नगरसेवक असताना असलेला ‘आव्वाज’ २८ नगरसेवक असतानाही का नाही, असा जाबही त्यांनी विचारला. या बैठकीस िपपरीतील पदाधिकाऱ्यांना व नगरसेवकांना आमंत्रण नव्हते. तामुळे िपपरीसाठी स्वतंत्र बैठक व्हावी, अशी मागणी पक्षकार्यकर्त्यांकडून होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचा प्रभाव असतानाही मनसेची ताकद वाढते आहे. काहीही नियोजन नसताना व ठाकरेंची एकही सभा वा बैठक झाली नसताना मनसेचे चार नगरसेवक निवडून आले. पराभूत झालेल्या बहुतांश उमेदवारांनी आश्चर्य वाटेल, अशी मते मिळवली आहेत. मनसेचा उमेदवार िरगणात असल्यास शहरातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांची समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे मनसेने आतापासूनच व्यूहरचना करावी, असा पक्षात सूर आहे. शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव व मावळचे खासदार गजानन बाबर यांना मनसेचा उमेदवार िरगणात नसल्याचा थेट फायदा झाला होता, याकडे कार्यकर्ते वारंवार लक्ष वेधत आहेत. यासंदर्भात, पक्षातील एका स्थानिक नेत्याकडे विचारणा केली असता, राज ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष द्यावे, येथेही बैठक घ्यावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तशी विनंती आम्ही वरिष्ठांकडे केली आहे. लवकरच त्याचा विचार होईल व बैठकीचे आयोजन होईल, असा विश्वास वाटतो.
साहेब, आमचेही प्रगतिपुस्तक तपासा! – पिंपरी मनसेतील सूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्याच पध्दतीने पिंपरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक व्हावी, असा सूर पक्षातून व्यक्त होत आहे.
First published on: 01-06-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri mns also wishes to check their progress card