पिंपरी : खेळाडू, जलतरण पट्टू, विरोधक या साऱ्यांचा विरोध डावलून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याचा दावा करत महापालिका प्रशासनाने शहरातील जलतरण तलावांचे खासगीकरण केले आहे. शहरातील दहा जलतरण तलाव तीन वर्षांच्या कालावधीसाठी खासगी संस्थांना संचलनास दिले आहेत. तिकीट विक्री, स्वच्छता, सुरक्षा, पाणी शुद्धीकरण असे कामकाज संस्था पाहणार आहेत. या निर्णयामुळे कोट्यवधी रूपये खर्चाची बचत होईल, असा महापालिकेचा दावा आहे.
महापालिकेच्या वतीने जलतरणपटूंना सरावाची सुविधा उपलब्ध व्हावी, नागरिकांना, विद्यार्थ्यांना पोहण्याचा आनंद घेता यावा, यासाठी केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळेगुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत १३ जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी माेहननगर येथील तलावाचे काम सुरू आहे. तर, केशवनगर आणि आकुर्डीतील तलावाच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने फेरनिविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. उत्पनापेक्षा खर्च अधिक असल्याचा दावा करत महापालिकेने जलतरण तलाव चालविण्यास देण्यासाठी तीन वेळा निविदा प्रसिद्ध केली होती, मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने क्रीडा विभागाने निविदा रद्द केली.
अटी-शर्ती बदलून नव्याने १३ ऑगस्ट २०२४ रोजी निविदा प्रसिद्ध केली. त्याला प्रतिसाद मिळाला. अधिक उत्पन्न देणाऱ्या संस्थांना तलाव चालविण्यासाठी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. यामुळे जलतरण तलावावर होणा-या कोट्यवधींच्या खर्चात बचत होईल. पाणी शुद्धीकरण, सुरक्षारक्षक, जीवरक्षक, कर्मचारी, क्रीडा पर्यवेक्षक तसेच, दुरूस्ती काम, सुशोभीकरण, वीज देयक, पाणीपट्टी आदी खर्चाची बचत होणार आहे. संस्थांकडून महापालिकेला आठ तलावासाठी तीन वर्षांकरीता प्रत्येकी २८ लाख ६५ हजार ६०० रूपये, तर थेरगाव तलावातून १८ लाख ७२ हजार आणि नेहरूनगर तलावातून २७ लाख रूपये उत्पन्न मिळणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
पुण्यातील संस्थांकडे जबाबदारी
कसबा पेठ येथील एचटूओ टेक्रो या संस्थेला संभाजीनगर, वडमुखवाडी, यमुनानगर आणि पिंपळेगुरव येथील चार तलाव, अवधूत फडतरे यांना भोसरी, पिंपरीगाव, सांगवी आणि कासारवाडी येथील तलाव, शुक्रवार पेठेतील एचटूओ अॅक्वा फन अनलिमिटेड पुल्स या संस्थेला नेहरूनगर येथील तलाव, खडकवासला येथील हर्षवर्धन डेव्हलपर्सला थेरगाव तलाव संचलनास देण्यात आले आहेत.
हेही वाचा…राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
जलतरण तलाव हे उत्पन्नाचे स्रोत नाही. ही सेवा आहे. प्रशासनाने खासगीकरणाचा फेरविचार करावा. उत्पन्नाचे इतर स्त्रोत वाढवावेत. निगडी, प्राधिकरणातील तलाव सुरू करावा अशी मागणी माजी नगरसेवक अमित गावडे यांनी केली.
सध्या पोहोण्यासाठी एक तासाकरिता असलेले २० रूपयांचे शुल्क कायम राहणार आहे. संस्थेला दरवाढ करता येणार नाही. पर्यवेक्षकांकडून तलावांची तपासणी केली जाईल. काही तलावांचे पाणी शुद्धीकरण व्यवस्थित हाेत नव्हते. जीवरक्षक आणि पाणी शुद्धीकरणाचे स्वतंत्र ठेकेदार असल्याने जबाबदारी निश्चित करता येत नव्हती. खासगी संस्थेला पूर्णपणे तलावाची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येईल आणि उत्पन्नातही वाढ हाेईल, असे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले.