पिंपरी: चिखली, कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड काढून घेण्यासाठी व्यावसायिकांना दिलेली सहा दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने शनिवारी पहाटेपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. या भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून छावणीचे स्वरूप आले आहे. या भागातील इंटरनेट सेवा बंद केली असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने चिखली, कुदळवाडी परिसरातील भंगार दुकाने, गोदाम तसेच, हॉटेल, बेकरी, पत्राशेड, वर्कशॉप अशा अनधिकृत असलेल्या पाच हजार अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा दिल्या होत्या. १५ दिवसांची मुदत संपल्यानंतर अनधिकृत गोदामे, पत्राशेड, बांधकामे हटवण्यासाठी ३० जानेवारी रोजी महापालिकेचे पथक गेले होते. मात्र, या कारवाईविराेधात व्यावसायिक रस्त्यावर उतरल्याने कारवाई न करताच महापालिकेचे पथक माघारी परतले होते. ३१ जानेवारी रोजी ही कारवाईला विरोध झाला.

 त्यानंतर महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामे, पत्राशेड काढून घेण्यासाठी व्यावसायिकांना सहा दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत शुक्रवारी संपली, पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने शुक्रवारी कारवाई केली नव्हती. शनिवारी पहाटे पाच वाजल्यापासून तगडा बंदोबस्त घेऊन महापालिकेचे अतिक्रमण पथक कुदळवाडीत थडकले. सकाळपासून अनधिकृत गोदामे, पत्राशेड, बांधकामे हटवण्याची कारवाई सुरू आहे.

या कारवाई बाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘गेल्यावर्षी जानेवारीत चिखली-कुदळवाडीवाडीतील विकास आराखड्यातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आली होती. या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत भंगार दुकाने, गोदामे, उद्योग आहेत. या अनधिकृत उद्योग, भंगार गोदामुळे वायू प्रदूषण वाढत आहे. कुदळवाडीतील नाल्यातून उद्योगाचे रसायन मिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. या भागात वर्षातून बारा वेळा मोठी आग लागते. महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभागाची कोणतीही मान्यता घेतली जात नाही. अनधिकृतपणे गोदामे, उद्योग सुरू होते. दीड महिन्यांपूर्वी अनधिकृत व्यावसायिकांना नोटिसा दिल्या होत्या. आज महापालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केली आहे. शहरातील ज्या भागात अनधिकृत गोदामे असतील, तिथेही टप्याटप्याने कारवाई केली जाणार आहे’.