पिंपरी : महापालिकेतील विकासकामांकरिता सल्ला घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सल्लागार पॅनलबाबत तक्रारी वाढल्यामुळे अस्तित्वात असलेले सल्लागार आणि वास्तुविशारद पॅनल रद्द करण्यात आले आहे. पॅनल आणि वास्तुविशारद नव्याने नियुक्त करण्यात येणार, असून त्यासाठी महापालिकेने अर्ज मागविले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागात वरिष्ठ, कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. असे असतानाही पदपथाच्या कामापासून रस्ते, उद्यान, उड्डाणपूल, प्रेक्षागृहांसह विविध लहान-माेठ्या प्रकल्पांसाठी काेट्यवधी रुपये माेजून सल्लागार आणि वास्तुविशारदांची नियुक्ती केली जाते. काही ठिकाणी सल्लागारांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे विकासकामे फसली आहेत. मात्र, त्यानंतरही सल्लागार नेमण्याचा सपाटा सुरूच आहे. सल्लागार आणि वास्तुविशारद पॅनलबाबत तक्रारी आल्याने ते रद्द करण्यात आले आहे. आता नवीन पॅनल नियुक्त करण्यात येणार आहे.

नवीन पॅनलसाठी पाच काेटी रुपयांहून अधिक रकमेच्या कामासाठी सल्लागार आणि दाेन काेटींच्या कामासाठी वास्तुविशारद नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविले आहेत. इमारत बांधकाम, रस्ते, पूल, भुयारी मार्ग, पाणीपुरवठा व जलःनिसारण, उद्यान, विद्युत, पर्यावरण अभियांत्रिकी, गृहनिर्माण व झोपडपट्टी निर्मूलन प्रकल्पांसाठी सल्लागारांच्या तीन श्रेणी आहेत. यामध्ये पाच ते २० काेटी, २१ ते ५० काेटी आणि ५० काेटींपुढील कामे अशा पद्धतीने श्रेणी आहेत. वास्तुविशारदांमध्ये चार श्रेणी आहेत. यामध्ये इमारत व आंतरिक रचना, उद्यान व ‘लॅण्डस्केपिंग’, शहरी रस्त्यांची रचना अशा प्रकारच्या कामासाठी दोन ते पाच काेटी, पाच ते २० काेटी, २१ काेटी, ५० काेटी आणि ५० काेटींच्या पुढील कामे अशा पद्धतीने वर्गवारी करण्यात आली आहे.

सल्लागार, वास्तुविशारदांसाठी नियम, अटी

प्रकल्प सल्लागार आणि वास्तुविशारद यांना कोणत्याही प्रकारच्या श्रेणीमध्ये अर्ज करता येणार आहे. प्रकल्प सल्लागार आणि वास्तुविशारद नेमणुकीसाठी शासकीय, निमशासकीय संस्थेचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र, पाच वर्षांचा प्रकल्प सल्लागार, वास्तुविशारद क्षेत्रातील कामाचा अनुभव प्रमाणपत्र, शासकीय कामे पूर्ण केल्याचे शासकीय, निमशासकीय अधिकाऱ्याने दिलेले अनुभव प्रमाणपत्र, संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व जबाबदार कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. प्रकल्प सल्लागार, वास्तुविशारद हा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील पदवी, पदव्युत्तर पदवीधारक अभियंता असणे गरजेचे आहे.

सल्लागार, वास्तुविशारद पॅनलमध्ये शंभरहून अधिक सदस्य आहेत. त्यांपैकी काही सल्लागारांच्या तक्रारी हाेत्या. प्रकल्प सल्लागार, वास्तुविशारद पॅनलची मुदतही संपली होती. त्यामुळे नव्याने पॅनल तयार करण्यात येत आहे. पॅनल तयार करण्यासाठी काही बदल करून अर्ज मागविण्यात आले असल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

Story img Loader