नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा ‘लोकसत्ता’चा हा पुढाकार…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात विविध रस्त्यांवर ४० किलोमीटर अंतराचे सायकल मार्ग (ट्रॅक) तयार केले आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे. आणखी ४० किलोमीटर अंतरावर सायकल मार्ग बनविण्यात येणार आहेत. मात्र, या मार्गावर मोठ्या प्रमाणात अडथळे आहेत. हे मार्ग सुरक्षित आणि सलग नसल्याने सायकलस्वारांना अडथळ्यांची मोठी शर्यत पार करावी लागते. अनेकदा या मार्गावर सायकलस्वारांचे अपघात झाल्याचेही प्रसंग घडले आहेत. शहरात ४५ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर स्वतंत्रपणे सायकल मार्ग बनविले आहेत. ज्या ठिकाणी कमी रुंदीचे रस्ते आहेत, तेथे लाल रंगाचे पट्टे तयार करून सायकल मार्ग तयार करण्यात आले आहेत. शहरात विविध रस्त्यांवर एकूण ४० किलोमीटर अंतराचे सायकल मार्ग आहेत. हे मार्ग महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने केले आहेत.

काय आहेत अडथळे?

सायकल मार्ग सलग नसल्याने अडथळे निर्माण होत आहेत. सायकल मार्गावर मध्येच झाड, बाके, कठडा, महावितरणचे डीपी बॉक्स, दिव्याचा खांब, उभी केलेली वाहने, विक्रेते, दुकानदारांचे साहित्य, राडारोडा, कचऱ्याचे ढीग, नामफलक, तुटलेले चेंबरचे झाकण, तुटलेली केबल, उघड्या वीजवाहक केबल, अतिक्रमण असे असंख्य अडथळे आहेत. त्यामुळे सायकलस्वारांना सुरक्षितपणे सायकल चालविता येत नाही. परिणामी, सायकल मार्गासाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यात अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत.

‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ उपक्रम बंद

पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी लिमिटेड’च्या वतीने शहरातील २०० पेक्षा अधिक ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ उपक्रम राबविण्यात आला. अनेक स्मार्ट सायकली चौका-चौकांत उपलब्ध करून देण्यात आल्या. ‘स्मार्ट मोबाइल’द्वारे तासाचे दहा रुपये भाडे भरल्यानंतर त्या सायकली चालविण्याची सोय होती. मात्र, या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे करोनापूर्वीच हा उपक्रम गुंडाळण्यात आला. काही सायकलची तोडफोड करण्यात आली, तर काही चोरीस गेल्या आहेत.

या मार्गांवर स्वतंत्र सायकल मार्ग

सांगवी फाटा ते साई चौक, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते एम. एम. स्कूल, चिंचवडगाव ते वाल्हेकरवाडी चौक, केएसबी चौक ते कुदळवाडी, एम्पायर इस्टेट ते ऑटो क्लस्टर चौक, निगडी भक्ती-शक्ती चौक ते रावेत पूल आणि पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव या रस्त्यावर स्वतंत्र सायकल मार्ग आहेत. तर, आकुर्डीतील निसर्ग दर्शन ते गंगानगर रस्ता, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सायकल मार्ग विकसित केला जात आहे.

नागरिकांचे म्हणणे काय?

महापालिकेने पदपथावर सायकल मार्ग करावा. त्यावर लालऐवजी हिरव्या रंगाचा पट्टा मारावा. सुरक्षित व अतिक्रमणमुक्त सायकल मार्ग बांधावेत. वाकडपासून माहिती व तंत्रज्ञाननगरी हिंजवडीतील तिन्ही टप्प्यांपर्यंत सायकल मार्ग विकसित करावा. जेणेकरून या भागातील नागरिकांचा सायकलचा वापर वाढेल. परिणामी, वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल, असे इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे सदस्य गजानन खैरे म्हणाले.

प्रशासनाचे म्हणणे काय?

नागरिकांनी सायकलवर प्रवास करावा यासाठी सायकल मार्ग तयार केले जात आहेत. ४० किलोमीटर अंतराचे सायकल मार्ग बनविण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात आणखी ४० किलोमीटर अंतराचे सायकल मार्ग तयार करण्यात येणार आहेत. सायकल मार्गावरील अडथळे दूर केले जातील. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी नागरिकांनी सायकल वापरावी, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे वाहतूक नियोजन विभागाचेकार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

(समन्वय : गणेश यादव)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri municipal corporation cycle track barriers pune print news ggy 03 ssb