पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथे योगा पार्कमध्ये पाच कोटी रुपये खर्च करून कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत (क्लायम्बिंग वॉल) उभारण्यात येत आहे. त्या भिंतीचे परिचालन खासगी संस्थेकडे विनामूल्य २० वर्षे देण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा आयोजन, प्रशिक्षण व इतर कामकाज संस्था पाहणार आहे.

पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमध्ये कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत बांधण्यात येत आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भारतीय पर्वतारोहण या स्पोर्ट्स क्लायम्बिंग संस्थेचे सचिव कीर्ती पैस यांच्याबरोबर बैठक झाली. बैठकीतील चर्चेनुसार महाराष्ट्र स्पोर्ट्स असोसिएशनने कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत परिचालनासाठी महापालिकेस प्रस्ताव दिला आहे. त्यास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

महापालिका संबंधित संस्थेबरोबर करारनामा करणार असून, तो २० वर्षांसाठी असणार आहे. संबंधित संस्था स्पोर्ट्स क्लायम्बिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक नेमणार आहे. सभागृह, स्टोअर रूम, स्वच्छतागृह व स्नानगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवार आणि प्रतीक्षा कक्ष आदी ठिकाणचे विजेचे शुल्क संस्था भरणार आहे. शहरातील खेळाडूंना प्रशिक्षण देणे, शहरात या खेळाचा प्रसार व प्रचार करणे, महापालिका शाळेतील कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ८० विद्यार्थी-खेळाडूंना या ठिकाणी मोफत प्रशिक्षण देणे संस्थेवर बंधनकारक आहे. संस्थेला या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करावे लागणार आहे. भिंतीच्या परिसरातील फ्लड लाइट व दिव्यांच्या खांबांसाठी लागणारी वीज, तसेच भिंतीसाठी पाणी व सुरक्षा महापालिका मोफत पुरविणार आहे. त्या ठिकाणी नव्याने काही गोष्टी आवश्यक असल्यास महापालिका विकसित करून देणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनासाठी महापालिका निधीही देणार आहे.

नेहरूनगर येथील कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत धूळखात

महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअमच्या आवारात कृत्रिम प्रस्तरारोहण भिंतीची उभारणी करण्यात आली होती. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून साहित्यही खरेदी करण्यात आले. त्या ठिकाणी काही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मात्र, काही वर्षांतच भिंतीचा वापर बंद करण्यात आला.