पिंपरी : शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रदूषण करणाऱ्यांवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी दोन खासगी संस्थांची नियुक्ती केली आहे. रस्ता, नदी, नाल्याच्या कडेला अनधिकृत भराव, बांधकाम राडारोडा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर या संस्थांचे कर्मचारी दंडात्मक कारवाई करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. असे असतानाही शहरातील, शहराबाहेरील नागरिक रस्ता, नदी, नाल्याचा कडेला अनधिकृत भराव, बांधकामाचा राडारोडा टाकतात. सार्वजनिक ठिकाणी घनकचरा टाकला जातो. पदपथावर घाण, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे, सार्वजनिक सभा संपल्यानंतर साफसफाई न करणे, जैववैद्यकीय घनकचरा सार्वजनिक ठिकाणी फेकणे, कचरा जाळणे, प्लॅस्टिकचा उपयोग करणे, मोकळ्या जागेवर अस्वच्छता ठेवणे, डास उत्पन्न करणाऱ्या जागा निर्माण करणे, तसेच लहान उद्योजक, कारखानदार सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात, नदीपात्रात सोडतात. आरएमसी प्लॉटमधून हवेचे प्रदूषण होते. यामुळे महापालिका परिसरात अस्वच्छता पसरते. परिणामी, पर्यावरणाची हानी होऊन प्रदूषणात भर पडत आहे.

ही हानी रोखण्यासाठी शुभम उद्योग प्रा. लि. आणि सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी प्रा. लि. या संस्थांंची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांचे कर्मचारी हे अस्वच्छता करणाऱ्यांवर २४ तास करडी नजर ठेवणार असून, दंडात्मक कारवाई करणार आहेत.

शहरात महापालिकेचे सहा हजारांंहून अधिक सफाई कर्मचारी दररोज स्वच्छता करतात. शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग गरजेचा आहे. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. औद्योगिक कंपन्यांनी रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया करून नदीपात्रात सोडावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri municipal corporation has appointed two private organizations to keep a 24 hour watch on polluters pune print news ggy 03 amy