पिंपरी : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीला अनामत रक्कम मागितल्याचे समोर आल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील ६५० खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. यापुढे कोणत्याच रुग्णालयाने रुग्णाकडून अनामत रकमेची मागणी करू नये, तसेच मागणी केल्यास परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील ६५० नोंदणीकृत रुग्णालयांना अनामत रक्कम न घेण्याबाबत परिपत्रक काढले आहे. रुग्णालयामध्ये येणाऱ्या अतितत्काळ आणि तत्काळ उपचारासाठी जे रुग्ण येतील त्यांच्यावर पहिल्यांदा तप्तरतेने उपचार करणे आवश्यक आहे. यामध्ये अनामत रक्कमही येते. महापालिकेकडून रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे या कायद्यांतर्गत येणारी दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. यामध्ये रुग्णालयांना नोटीस देणे, नोटिशीमधून खुलासा मागणे आणि सक्त सूचना देणे, तसेच दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे. पुन:पुन्हा त्याच चुका होत असतील, तर परवानाही रद्द करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.