पिंपरी महापालिका प्रशासनाने झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण योजना राबवून रेल्वेबाधित नागरिकांना घरे द्यावीत, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेचे प्रशासक व आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. त्यादृष्टीने सकारात्मक विचार सुरू असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे, असं सांगत नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहनही बारणे यांनी केलं आहे.


रेल्वे विभागाच्या जागेवरील चिंचवड, आनंदनगर, साईबाबानगर, दळवीनगर तसंच दापोडीतील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे विभागाने नोटीस बजावली आहे. रेल्वेकडून कधीही कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट आहे. यासंदर्भात बारणे यांनी आय़ुक्तांची भेट घेतली.


ते म्हणाले,”महापालिका हद्दीत आनंदनगर, दापोडी, दळवीनगर परिसरात रेल्वेच्या जागेवर झोपडपट्ट्या आहेत. त्या काढण्याबाबत रेल्वेने नोटीस दिली आहे. कारवाईच्या धास्तीने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहत असलेल्या या नागरिकांना पुनर्वसन योजनेत घरे देण्यात यावीत. रेल्वेबाधितांना घरे देण्याबाबतची कार्यवाही पालिकेकडून सुरू आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिल्याचं बारणे यांनी सांगितलं. “