पिंपरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हस्तांतरित केलेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित करण्यात येऊ नये. लाभार्थी महिलांकडून थकीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बंद असलेली बँक खाती तत्काळ सुरू करण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांना केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची एकत्रित रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केली आहे. परंतु, काही लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्यापही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने बँकांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बँकेशी आधार संलग्न नसलेल्या महिलांची यादी बँकनिहाय जाहीर केली आहे. आधार संलग्न नसल्याने अनेक महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झालेली नाही, अशा महिलांना संपर्क करून उर्वरित कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी विशेष मोहीम आयोजित केली जाणार आहे. जेणेकरून या मोहिमेच्या माध्यमातून बँकेशी आधार संलग्न करण्याचे कामकाज पूर्ण करण्यात येईल.
हेही वाचा >>>शैक्षणिक, अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण… शिक्षकांना कोणती कामे करावी लागणार?
प्रलंबित कर्जाची परतफेड न केल्याने बंद झालेली लाभार्थी महिलांची बँक खाती तत्काळ सुरू करावीत. लाभार्थ्यांना रक्कम उपलब्ध करून द्यावी. योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची रक्कम बँकांनी वजा करू नये, बँक खात्यांबाबत काही अडचणी असल्यास तत्काळ वरिष्ठांसोबत चर्चा करून अडचणींवर तोडगा काढावा. बँक प्रतिनिधींनी योजनेबाबत शासन निर्णयाचे पालन करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केल्या.