तृतीय पंथीयांना सर्व सामान्यांसारखे जगता यावे, रस्त्यावर, चौकांमध्ये भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, त्याऐवजी त्यांना नोकरी किंवा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने पिंपरी पालिकेने तृतीय पंथीयांसाठी विविध योजना तयार केल्या आहेत. पिंपरी पालिकेच्या २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात तृतीयपंथी व्यक्तींच्या विकासासाठी २५ लाख रूपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. रोजगार उपलब्ध झाला तर तृतीय पंथी सन्मानाने जगू शकतात. त्यादृष्टीने नामांकित संस्थेमार्फत त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
पिंपरी पालिकेच्या वतीने आयोजित तृतीय पंथी ओळख दिवसाच्या कार्यक्रमात बोलताना प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी ही माहिती दिली. अशाप्रकारे तृतीय पंथी ओळख दिवस साजरा करणारी पिंपरी-चिंचवड ही पहिलीच महानगरपालिका आहे, असा दावाही त्यांनी केला. या कार्यक्रमात समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जिंतेद्र वाघ, उप आयुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे तसेच तृतीय पंथीयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तृतीय पंथी समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि सन्मानजनक स्थान निर्माण करण्यासाठी रोजगारासारख्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिकेचे नारनवरे यांनी आभार मानले. तृतीय पंथीयांनी त्यांच्या समस्यांबाबत समाजकल्याण विभागाकडे लेखी स्वरुपात मागण्या केल्यास त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी तृतीय पंथीयांना सर्व सामान्यासारखी वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून पोलीस प्रशासनामार्फत सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
आम्हाला माणूस म्हणून जगायचा अधिकार द्या, अशी साद घालत स्वत:च्या हक्कांसाठी तृतीय पंथी समाज वर्षानुवर्षे झगडतो आहे. समाजाने निरोगी मनाने त्यांना आपले म्हणण्याची गरज आहे. काही तृतीयपंथी व्यक्ती वेगवेगळया क्षेत्रात उच्च पदावर आहेत, अशी प्रतिक्रिया पिंपरी पालिकेचे समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी दिली आहे.