पिंपरी : पाणी पुरवठा विभाग, फायबर नेटवर्किंग, महावितरण, एमएनजीएची पाइपलाइन टाकण्यासह विविध कामांसाठी रस्ते खोदाई करण्याकरिता १५ मे २०२४ पर्यंत परवानगी दिली जाणार आहे. त्यानंतर विनापरवाना खोदाई केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे.
विविध सेवा वाहिन्यांच्या कामासाठी वारंवार केले जाणारे खोदकाम आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या रस्ते दुरुस्तीमुळे शहरातून वाहने चालविणे अवघड होते. त्यामुळे लहान-मोठे अपघात होतात. ते टाळण्यासाठी शहरातील मुख्य रस्ते आणि अतिवर्दळीच्या रस्त्यांवरील जलवाहिन्या, जलनिस:रण वाहिका, पावसाळी गटारे, इंटरनेट आणि अन्य केबल, एमएनजीएल तसेच, वीज वाहिन्यांची कामे येत्या १५ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर खोदकामास परवाना दिला जाणार नाही. केवळ अत्यावश्यक बाब म्हणून काही कामांसाठी रस्ते खोदाईला परवानगी दिली जाणार आहे.
हेही वाचा…विमान इंजिनची निर्मिती करणाऱ्या जीई एरोस्पेसची पुण्यात मोठी गुंतवणूक
रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोणत्याही कामासाठी रस्ते आणि पदपथ खोदकामास परवानगी दिली जाणार नाही. केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कामांना अटी आणि नियम टाकून परवानगी दिली जाणार आहे. विनापरवाना खोदकाम केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच, फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.