पिंपरी : घरचा ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी जनजागृती करण्यारिता महापालिकेच्या आरोग्य विभागाने नेमलेल्या संस्थांना पुन्हा मुदतवाढ दिली आहे. तीन महिन्यांसाठी पाच कोटी ३७ लाख ८४ हजार रुपयांचा खर्च येणार आहे.
मध्यप्रदेशमधील इंदूर शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी विविध संस्थांची नेमणूक केली आहे. या संस्था नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत जनजागृती करतात, असा महापालिकेचा दावा आहे. त्यासाठी इंदूर येथील बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेचर्स लि, डिवाईन मॅनेजमेंट ॲण्ड सर्व्हिसेस, जनवाणी या संस्थांना काम देण्यात आले आहे.
हेही वाचा…स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड देशात तेरावे, राज्यात तिसरे
निविदा प्रक्रिया राबवून या तीन संस्थांना नोव्हेंबर २०२१ पासून एका वर्षासाठी नेमण्यात आले होते. त्या बदल्यात या संस्थांना घरटी तसेच, प्रत्येक दुकानांमागे २४ रुपये ४५ पैसे दरमहा दिले जातात. या संस्थांची एका वर्षांची मुदत संपली. मात्र, आरोग्य विभागाने निविदा प्रक्रिया राबविली नाही. तीन संस्थांना थेट एका वर्षांची मुदतवाढ दिली. त्यानंतरही महापालिकेने कोणतीही निविदा प्रक्रिया राबवली नाही. त्यामुळे या तीन संस्थांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी पाच कोटी ३७ लाख ८४ हजार ८८८ रुपये खर्च होणार आहे.