पिंपरी : चिखली येथील कुदळवाडी भागात आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली.  महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि क्षेत्रीय धडक कारवाई पथकांमार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये रविवारी ६८ लाख ७८ हजार चौरस फूट बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सुमारे ६०७ बांधकामे भुईसपाट करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या राबविलेल्या या कारवाईमध्ये पहिल्या दिवशी २२२ आणि आज दुसऱ्या दिवशी ६०७ बांधकामे निष्कासित करण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता सुनिल बागवानी यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील चार कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. १६ पोकलेन, आठ जेसीबी, एक क्रेन आणि चार कटर यांचा वापर  निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय तीन अग्निशमन वाहने आणि दोन रुग्णवाहिका देखील येथे तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झाले होते.

महापालिकेच्या आरक्षित जागेवर तसेच विकास आराखड्यातील रस्त्यांवर असलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर ब्लॉकनिहाय अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे. यामध्ये ज्यांचे साहित्य किंवा मशिनरी असतील त्यांनी त्या तात्काळ काढून घेऊन  महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन  अतिरिक्त आयुक्त- प्रदीप जांभळे -पाटील यांनी केले.