पिंपरी : ओला आणि सुका कचरा एकत्र देणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, थुंकणे, उघड्यावर शाैच करणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे, व्यावसायिक आस्थापनेमार्फत कचरापेटी न ठेवणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेच्या आराेग्य विभागामार्फत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सरत्या आर्थिक वर्षात ७ हजार २१४ आस्थापना आणि नागरिकांकडून एक काेटी ४८ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेतला आहे. यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर जनजागृती आणि उपक्रम सुरू करून स्वच्छागृह मोहीम राबविली जाते. ओला, सुका कचरा वर्गीकरणावर भर दिला आहे. नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ओला आणि सुका कचरा एकत्र देणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, थुंकणे, उघड्यावर शाैच करणे, डासाेत्पत्ती स्थानांची निर्मिती करणे, रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे, जैववैद्यकीय घनकचरा रस्त्यावर टाकणे, सार्वजनिक सभा, समारंभ सपल्यावर स्वच्छता न करणे, अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. त्यात ३०० रुपयांपासून ३५ हजार रुपयांपर्यत दंड आकारण्यात येत आहे.

शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, स्वच्छ सर्वेक्षणात शहराची क्रमवारी सुधारावी, यासाठी महापालिकेचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग