लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. गटांना स्वयंरोजगार प्राप्त करून दिला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन कक्षाची (पीएमयू) निर्मिती केली आहे. टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज् ट्रस्ट या खासगी संस्थेमार्फत तीन वर्षे चालविल्या जाणाऱ्या या कक्षासाठी आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शहरातील बचत गटांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी पालिकेकडून अनुदान दिले जाते. शहरात महिला बचत गटांची संख्या अधिक आहे. आता दिव्यांग, तृतीयपंथीय, तसेच कोरोनामध्ये विधवा झालेल्या महिलांचेही कोरोना योद्धा महिला बचत गट स्थापन केले आहेत. बचत गटातील महिलांची क्षमता विकसित करणे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे, उद्योगविकास घडवून आणणे, रोजगारांच्या संधी व बाजारपेठ यांची सांगड घालण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, संस्थात्मक बांधणी, आर्थिक साक्षरता, दप्तर व्यवस्थापन, डिजिटल साक्षरता या माध्यमातून बचत गटांचे व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी कक्षाची स्थापना केली आहे.
आणखी वाचा-पुणे : संगणक अभियंता ‘सेक्सटाॅर्शन’च्या जाळ्यात; १० लाखांची फसवणूक
या कक्षाचे कामकाज करण्यासाठी २४ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२२ या एका महिन्यात प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानंतर मध्यवर्ती भांडार विभागाकडून निविदा काढण्यात आली. त्यात टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज् ट्रस्ट आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हन्मेंट अशा दोन खासगी संस्थांचा प्रतिसाद मिळाला. दोन्ही संस्थांनी सादरीकरण केले. टाटा कम्युनिटीने कक्षाचे तीन वर्षाचे काम सात कोटी ६८ लाख ५९ हजारांमध्ये करण्याची तयारी दर्शविली. हा खर्च समाज विकास विभागाच्या महिला बचत गटांसाठी ‘मिशन स्वावलंबन’ या उपलेखाशिर्षाच्या तरतुदीतून करण्यात येणार आहे.
गटाच्या क्षमतेनुसार व्यवसाय निवड
शहरातील सर्व बचत गटांचे सर्वेक्षण करुन संगणकीय डाटा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाद्वारे तयार करण्यात येणार आहे. गटाच्या क्षमता वाढीसाठी मुलभूत प्रशिक्षण आणि लेखाविषयक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गटाच्या क्षमतेनुसार व्यवसायाची निवड करुन देणे, गटांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, महिलांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावे, या उद्देशाने विविध उद्योगांची महिती देणे, उद्योग आणि व्यवसायासाठी प्रवृत्त करणे आदी कामे हा कक्ष करणार आहे.
आणखी वाचा-पुणे: दौंडमध्ये पत्नी, दोन मुलांचा खून करुन डाॅक्टरची आत्महत्या, कौटुंबिक वादातून टोकाचे कृत्य
नोंदणीकृत २० हजार बचत गट
महापालिकेच्या वतीने बचत गटासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे शहरातील बचत गटांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेकडे २० हजार बचत गट नोंदणीकृत आहेत. पालिकेच्या समाज विकास विभागामार्फत बचत गटांना अनुदान, त्यांच्या वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पवना थडी जत्रा सारखे उपक्रम राबविले जात आहेत.
बचत गटांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविलेला मिशन स्वावलंबन हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. आता पहिल्या टप्प्यात दहा हजार, दुसऱ्या टप्प्यात पाच हजार आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित गटांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. -अजय चारठाणकर, उपायुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका