पिंपरी: पवना धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यात कपात झाल्यामुळे आजपासून १५ मिनिटांनी पाणी कपात होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. मात्र, हा संदेश खोटा असून कोणतीही पाणी कपात होणार नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध पाणी उपसा करून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. समान पाणीपुरवठा करण्यासाठी मागील चार वर्षांपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी असताना अधिकचे पाणी उपलब्ध होईपर्यंत दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यातच आता पुन्हा पाणी कपात होणार असल्याचा संदेश समाज माध्यमावर प्रसारित झाला आहे.
हेही वाचा… एनडीए रस्त्यावर कोयता गँगची दहशत; उपहारगृहातील कामगारांना मारहाण
पवना धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यात कपात झाल्यामुळे शहर अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्या सुचनेनुसार सर्व ठिकाणचा पाणीपुरवठा आजपासून १५ मिनिटांनी कमी करण्यात येत आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे असा संदेश प्रसारित झाला. त्यामुळे आणखी पाणी कपातीचे संकट ओढवणार का असा प्रश्न उपस्थित झाला. पण, हा संदेश खोटा असून पाणी कपात होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.