जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीर ९० वृक्षतोड केल्याप्रकरणी आकुर्डीतील मे. फॉरमायका कंपनीकडून पिंपरी पालिकेने ४५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या महिन्यात हे प्रकरण उघड झाल्यानंतर महापालिकेने कंपनीला याबाबत नोटीस बजावली होती.
कंपनीने बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली. वेगवेगळ्या प्रजातींची ९० झाडे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आली होती. ही वृक्षतोड पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे सांगत महापालिकेने प्रत्येक वृक्षामागे ५० हजार रुपये याप्रमाणे कंपनीला एकूण ४५ लाख रुपये दंड ठोठावला होता. त्यानुसार, उद्यान विभागाचे उप आयुक्त सुभाष इंगळे यांनी कंपनीला नोटीस बजावली होती. महापालिकेने कंपनीकडून खुलासा मागवला होता. अखेर, कंपनी दोषी असल्याचे सिध्द झाल्यानंतर महापालिकेने दंडात्मक कारवाईवर शिक्कामोर्तब केला.
त्यानुसार, झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार कंपनीकडून ४५ लाख रूपये वसूल करण्यात असल्याची माहिती प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.