पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या एनएच-४८ महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यांचा (सर्व्हिस रोड) विकास करण्याच्या दिशेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआय प्रकल्प हाती घेत आहे. हा प्रकल्प वाढत्या वाहतूक समस्यांचे निराकरण करण्यासोबतच कनेक्टिव्हिटी सुधारणे, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी करणे आणि सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या या रस्त्यावरील शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एनएच-४८ महामार्गाच्या बाजुने असणारा सध्याचा रस्ता १२ मीटर रुंद आहे. आता या रस्त्याचा १२ मीटर विस्तार करून एकूण रुंदी २४ मीटर करण्यात येणार आहे. एनएच-४८ हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने पुनावळे, भूमकर चौक, हिंजवडी आणि बालेवाडी या भागांतील वेगाने वाढणाऱ्या रहदारीच्या दृष्टीने हा विकास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महापालिका हद्दीमध्ये एनएच-४८ महामार्ग आणि सेवा रस्त्यांसह एकूण कॅरेजवे ६० मीटर लांबीचा आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना महापालिकेच्या नियोजनात असलेले प्रत्येकी १२ मीटर रुंद विकास आराखडा (डीपी) रस्ते आहेत. त्यामुळे या रस्त्याची एकूण रुंदी ८४ मीटर होईल. यामुळे ‘कनेक्टिव्हिटी’ सुधारण्यासाठी मदत होईल.

नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांना प्रतिसाद

कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सेवा रस्त्यांची स्थिती सुधारण्याची मागणी सातत्याने केली जात होती. सद्यस्थितीतील सेवा रस्त्यांची दयनीय अवस्था, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या आणि यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत अनेक प्रवासी आणि व्यवसायिकांनी वेळोवेळी तक्रारी येत होत्या. अखेर नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे.

६०४.५९ कोटी रुपयांचा खर्च

या प्रकल्पासाठी ६०४.५९ कोटी रुपयांचा अंदाजे खर्च आहे. रुंदीकरण आणि सुधारित सेवा रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होईल, प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल. यासोबतच रस्त्याच्या टिकाऊपणासाठी काँक्रीट फुटपाथ, पाणी साचण्यापासून बचावासाठी प्रगत निचरा प्रणाली, स्थानिक प्रवाशांसाठी आणि व्यवसायांसाठी वाहतूक अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे.

एनएच-४८ हा महामार्ग महापालिकेतील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून पुढे आली आहे. येथे शहरीकरण झपाट्याने झाले आहे. त्यामुळे आता एनएच-४८ महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. नवीन सेवा रस्त्यांमुळे मुख्य महामार्गावरील गर्दी कमी होईल. वाहतूक व्यवस्थापन सुधारेल. स्थानिक प्रवाशांसाठी आणि व्यवसायांसाठी सुलभ प्रवेश मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. हा प्रकल्प शहराच्या दीर्घकालीन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri national highway 48 service road expansion work it park hinjewadi traffic jam issue pune print news ggy 03 css