पिंपरी : मागील तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण ७६.२२ टक्के भरले आहे. तीन दिवसांत पाणलोट क्षेत्रात ४९९ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात २२.३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे १४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्रोत आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला होता. मावळातील आंद्रा, वडिवळे, टाटा या छोट्या धरणांमधील पाणीसाठ्यानेही तळ गाठायला सुरुवात केली होती. जून महिना कोरडा गेला. त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली होती. जुलैच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली. आठवडाभर पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. पुन्हा मागील तीन दिवसांपासून पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. नदी, नाले, ओढे जोरदार वाहू लागले. त्यामुळे तीन दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात २२.३५ टक्क्यांनी वाढ झाली. धरणातील साठा ७६.२२ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे मावळसह पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे.
पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे दुपारी चार वाजल्यापासून जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे १४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणातून पाणी सोडल्याने पवना नदी दुथडी वाहत आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारीया यांनी केले आहे.
© The Indian Express (P) Ltd