पिंपरी : दुचाकीवरून जाताना पिस्तुल हवेत फिरवून दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर घरफोड्या केल्या. त्यातून मिळालेल्या पैशांचा वापर करून मध्य प्रदेशात जाऊन पिस्तुल खरेदी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, आठ दुचाकी, चार पिस्तुल, चार जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या असा १७ लाख ६२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी चिखली परिसरात दुचाकीवरून जाताना पिस्तुल हवेत फिरवत ‘रील्स’ बनवून ते समाजमाध्यमातील इन्स्टाग्रामवर टाकल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांचे इतर साथीदार फरार होते. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी सुशील उर्फ बारक्या भरत गोरे (वय १८, रा. ओटास्कीम, निगडी) याने पिस्तुलाचा धाक दाखवून कपड्याच्या दुकानातून जबरदस्तीने कपडे चोरून नेले, काही ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. सुशील हा त्याचा साथीदार अक्षय प्रभाकर कणसे (वय २२) याच्यासोबत खेड तालुक्यातील कुरुळी येथे एका खोलीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सुशील आणि अक्षय या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या. पोलिसांनी त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

हेही वाचा – पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर महिलांची परवानगी न घेता वापरले फोटो, भाजप आमदाराविरोधात पोलिसांकडे तक्रार

सुशीलने त्याच्या साथीदारांसोबत मिळून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जबरी चोरी, घरफोडी, मारामारी असे अनेक गुन्हे केल्याचे तपासात समोर आले. या कारवाईमुळे खडकवासला, पर्वती, हडपसर, भारती विद्यापीठ, कोंढवा, सिंहगड, विश्रामबाग, चिखली, भोसरी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. सुशील विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची तोडफोड असे एकूण २८ गुन्हे दाखल आहेत. तो सहकारनगर आणि चिखली पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यात फरार होता.

हेही वाचा – मावळ विधानसभेवर भाजपच्या दाव्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली नाराजी म्हणाले…

घरातच चार गोळ्या झाडल्या

सुशील याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने चिखली परिसरात घरफोड्या केल्या. घरफोड्यामधून मिळालेल्या पैशांमधून त्याने मध्य प्रदेश येथे जाऊन पिस्तुल विकत आणल्या. त्या पिस्तुल व्यवस्थित चालतात की नाही, हे पाहण्यासाठी त्याने त्याच्या घरातच चार गोळ्या झाडल्या. त्याच्या चार रिकाम्या पुंगळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.