पिंपरी : दुचाकी चोरणाऱ्या एका अभियंत्यासह तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २६ लाख दहा हजार रुपये किमतीच्या ५३ दुचाकी जप्त केल्या. तसेच दुचाकी चोरीचे पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर, कोल्हापूर व सातारा येथील ३५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

संतोष मारुती शिंदे (वय ३२, रा. वाकड), धीरज प्रदीप सावंत (वय २३, रा. नऱ्हेगाव, पुणे), बालाजी उर्फ तात्यासाहेब दादा भोसले (वय २४, रा. शाहूपुरी, सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील धीरज हा अभियांत्रिकी अभियंता आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी परिसरात होत असलेल्या वाहनचोरी बाबत पिंपरी पोलिसांनी वाहन चोरी झालेल्या घटनास्थळावरील आणि इतर १५० ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यांची तपासणी केली. त्यातून वाहन चोरी करणाऱ्या संतोषची ओळख पटली. तो पिंपरी मेट्रोस्थानकाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संतोष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वाहन चोरी केल्याचे सांगितले. तसेच संतोष याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून आणखी ५३ वाहने चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी संतोष याचे साथीदार धीरज आणि बालाजी यांना अटक करून त्यांच्याकडून २६ लाख १० हजार रुपये किमतीच्या ५३ दुचाकी जप्त केल्या.

या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील २५, पुणे शहरातील चार, कोल्हापूर येथील दोन आणि सातारा येथील चार असे एकूण ३५ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) धनंजय कापरे, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, हांडे, पोलीस हवालदार बेंदरकर, बारशिंगे यांच्या पथकाने केली.