पिंपरी : ‘फॉरेक्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा होतो, असे सांगून एका व्यक्तीची एक कोटी १३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी ‘म्यूल’ खाते हाताळणाऱ्यासह त्याच्या साथीदाराला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मितेश राजूभाई व्होरा (३४), केपिन अजितकुमार मेहता (४१, दोघेही रा. अहमदाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मितेश हा गुजरातमधून ‘म्यूल’ खाते घेऊन केपिन याला पाठवत होता. केपिन हा फसवणुकीची रक्कम अशा म्यूल खात्यावर घेत होता. जानेवारी २०२५मध्ये पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात एक कोटी १२ लाख ९६ हजार ३८० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीला आरोपींनी वेगवेगळ्या कंपन्यांमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच, ‘फॉरेक्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले. आरोपींनी सुरुवातीला फिर्यादीकडून एक कोटी ३० लाख २३ हजार ५१५ रुपये घेतले. फिर्यादीचा विश्वास बसण्यासाठी त्यांना काही रक्कम परत केली. मात्र, एक कोटी १२ लाख ९६ हजार ३८० रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणात आरोपी अहमदाबाद, गुजरात येथे असल्याचे समजले. त्यानुसार सायबर पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर रवाना झाली. म्यूल खात्यामधील पैसे रोख स्वरूपात बँकेतून काढणारा मितेश याला अटक केली. त्यानंतर केपिन याला मीरा-भाईंदरमधून अटक केली. या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

‘म्यूल’ खाते म्हणजे काय?

सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वर्ग, प्राप्त करण्यासाठी सायबर चोरटे जे बँक खाते वापरतात, त्याला ‘म्यूल खाते’ म्हणतात. हे खाते इतरांच्या वतीने बेकायदा पैसे मिळवण्यासाठी आणि हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाते. ही खाती सर्वसामान्य व्यक्तींची असतात. त्यामध्ये कामगारांचा समावेश असतो. या नागरिकांकडून कागदपत्रे घेतली जातात. त्यांच्या नावे खाते काढले जाते. त्या बदल्यात खातेदाराला काही रक्कम दिली जाते. त्यानंतर हे खाते सायबर चोरटे हाताळतात.