पिंपरी : मोकळ्या मैदानात चादरीमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह असल्याची खबर हिंजवडी पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने वरिष्ठांना ही बाब कळवली. गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चादरीत गुंडाळलेला तो मृतदेह उलगडला आणि उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी चक्रावून गेले. तो मृतदेह मनुष्याचा नसून श्वानाचा असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराने उपस्थित सर्वांना दृश्यम चित्रपटाची आठवण झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी याबाबत माहिती दिली. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शिंदे वस्ती येथे चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची खबर हिंजवडी पोलिसांना मिळाली. हा खुनाचा प्रकार असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने ही बाब वरिष्ठांना कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेची पथकेही घटनास्थळी दाखल झाली.
हेही वाचा : शत्रूनेही गौरविलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्वकीयांकडून होणारी उपेक्षा ही शोकांतिका – अपर्णा कुलकर्णी
चादरीत गुंडाळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे फोटो काढण्यात आले. थोडी दुर्गंधीही येत होती. त्यानंतर पुढील पंचनामा करण्यासाठी चादर उलगडण्यात आली. पण चादर उलगडताच उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी चक्रावून गेले. चादरीमध्ये मनुष्याचा नव्हे तर चक्क एका श्वानाचा मृतदेह असल्याचे आढळून आले. उपस्थित असलेल्या सर्वांनी डोक्याला हात लावला. या प्रकारामुळे अनेकांना ‘दृश्यम’ चित्रपटाचीही आठवण झाली.