पिंपरी: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड पोलीसही सतर्क झाले आहेत. शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी व कायदा – सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता व्हिजीबल पोलिसिंग राबवले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी भेटी देवून सुचना दिल्या जात आहेत. नागरिकांशी संवाद साधला जात आहे.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. या पार्श्वभुमीवर पिंपरी – चिंचवड शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी व कायदा – सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय हद्दीत मोठ्या प्रमाणावर व्हिजीबल पोलीसिंग राबवले जात आहे.

यामध्ये पोलीस आयुक्तालयातील जास्तीत जास्त वरिष्ठ पोलीस अधिकारी व अमंलदार हे सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीची ठिकाणे असणारे मॉल, व्यापारीसंकुल, बाजार पेठ, उद्याने, पर्यटन स्थळे, रेल्वे बस स्थानक या सारख्या महत्वाच्या ठिकाणी भेटी देवून सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी योग्य पद्धतीने करण्याबाबत सुचना दिल्या जात आहेत. तेथील नागरिकांशी संवाद साधत आहेत.

शहरातील मिश्र लोकवस्ती असलेल्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीसांची दिवस-रात्र गस्त वाढवण्यात आली आहे. पोलिसांची विविध पथके तयार करुन त्याद्वारे गोपनीय माहिती संकलीत केली जात आहे. चुकीच्या अथवा सोशल मिडीयावर अफवा पसरविणार्‍या संदेशांवर पोलीस बारकाईने नजर ठेवून आहेत. धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या व प्रसारमाध्यमांमध्ये चुकीचे संदेश प्रसारीत करणार्‍या नागरिकांवर
कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.