पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांवर हल्ले, मारहाण, पोलिसांसोबत अरेरावी करणे असे प्रकार वाढले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांचं काही चालत की नाही, अशी स्थिती दिसत आहे. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल होण्याचं प्रमाण वाढलं असून पोलिसांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पिंपरीत पोलीस कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने मारल्याच प्रकरण समोर आलंय. त्यात पंडित लक्ष्मणराव धुळगंडे हे जखमी झाले आहेत. पिंपरीतील लालटोपी नगर मैदानावर पोलीस शिपाई धुळगंडे यांना मारहाण झाली असून यात मुका मार लागला आहे.
पोलीस शिपाई धुळवंडे हे विनामास्कची कारवाई करत होते. तेथील मैदानावर विनामास्क बसलेले टोळके दिसले. पोलीस शिपाई धुळगंडे यांना पाहून काही जण पळाले, पण आरोपी रामदास सोपान लुकर हा त्याच्या मित्रांसह तिथेच बसलेले होते. दरम्यान, धुळगंडे यांनी विनामास्कची पावती करत होते. तेव्हा, आरोपी लुकर याने पावती बुक हातातून हिसकावून घेतले. थेट शिवीगाळ करत धुळगंडे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली, अशी माहिती पंडित लक्ष्मणराव धुळगंडे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली. “माझ्यावर 28 गुन्हे आहेत 29 वा दाखल होईल. तुझी नोकरी घालवतो, अख्खी झोपडपट्टी चौकीसमोर आणतो”, अशा धमक्या दिल्याचं धुळगंडे यांनी सांगितलं.
पिंपरीतील लालटोपी नगर येथे राहणारे रामदास सोपान लुकर (वय- ६५), सतीश पवार (वय-४०) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पंडित लक्ष्मणराव धुळगंडे यांनी फिर्याद दिली आहे.