पुणे आणि िपपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’साठी एकच शहर म्हणून समावेश केल्यानंतर दोन्ही शहरांतील राजकारण ढवळून निघाले आहे. पुण्यापाठोपाठ िपपरीतील सर्वपक्षीय नेत्यांनीही शहराचा स्वतंत्र सहभाग असावा, यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यानच्या काळात िपपरीच्या ‘स्मार्ट सिटी’च्या समावेशाचे श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दहा शहरांची शिफारस केंद्राकडे केली, मात्र त्यामध्ये पुणे व िपपरी-चिंचवड एकच शहर म्हणून दाखवण्यात आले आहे. अशाप्रकारचा प्रस्ताव दोन्ही शहरांवर अन्याय करणारा आहे, अशी भावना दोन्हीकडे झाली आहे. त्यामुळे सर्वप्रथम पुण्यात व त्यापाठोपाठ िपपरीतही विरोधी सूर उमटला. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन शहरवासीयांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. केंद्र सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार शहरांचा समावेश करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत व याची पूर्ण जबाबदारी राज्यांची असल्याचे नायडूंनी स्पष्ट केल्याचे बारणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘स्मार्ट सिटी’साठी सहभाग निश्चित झाल्यापासून िपपरीत भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराचा झपाटय़ाने विकास झाला म्हणून यापूर्वीच्या सरकारने ‘बेस्ट सिटी’ म्हणून शहराचा गौरव केला. त्याचप्रमाणे येथील विकासकामांची दखल घेऊनच सध्याच्या सरकारने ‘स्मार्ट सिटी’त सहभाग दिला, असा मुद्दा राष्ट्रवादीकडून पुढे रेटण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पालिकेतील पक्षनेत्या मंगला कदम आणि माजी महापौर आझम पानसरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकतीच पक्षाची बाजू ठामपणे मांडली. दुसरीकडे, ‘सब का साथ, सब का विकास’ हे धोरण ठेवून काम करणाऱ्या भाजपमुळेच हे शक्य झाले असून, राष्ट्रवादीने स्व:तची टिमकी वाजवून घेऊ नये, असे भाजपचे संघटनमंत्री एकनाथ पवार यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा