पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील खराळवाडी भागातील रस्त्यामुळे वेगळे झालेले पाच गुंठे त्रिकोणाकृती क्षेत्र मूळ क्रीडांगणाच्या आरक्षणातून वगळण्याचा व तेथे निवासीकरणास मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १९९६ मध्ये पालिका सभेत याबाबतचा ठराव मंजूर झाला होता, त्यावर राज्य शासनाने १९ वर्षांनंतर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.
पिंपरीत खराळवाडीतील आरक्षण क्रमांक ९९ अनुसार खेळाच्या मैदानासाठी दोन एकर जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. १९७८ च्या मंजूर विकास योजनेत हे आरक्षण टाकण्यात आले होते. तथापि, प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या जागेवर आराखडय़ानुसार रस्ता करण्यात आला. या रस्त्यास १९९५ च्या विकास योजनेमध्ये १२ मीटर रस्तारुंदी प्रस्तावित करण्यात आली. रस्त्यामुळे आरक्षणाचे क्षेत्र दोन विषम भागात विभाजित झाले. सिटी सव्र्हे क्रमांक ५६७० हा पश्चिमेकडील त्रिकोणी आकाराचे क्षेत्र तयार झाले. हा छोटासा तुकडा खेळाच्या मैदानासाठी उपयुक्त नसल्याने ते क्षेत्र वगळण्यात यावे, अशी मागणी जमीन मालक अण्णा कुऱ्हाडे यांनी महापालिकेकडे केली. त्यानुसार, पालिकेने प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली. तीन ऑक्टोबर १९९६ मध्ये याबाबतचा ठराव पिंपरी पालिका सभेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर, हरकती, सूचना तसेच अन्य आवश्यक प्रक्रिया राबवण्यात आली. या फेरबदलाच्या कार्यवाहीची जाहीर सूचना २००४ मध्ये शासकीय राजपत्रात करण्यात आली. २००५ मध्ये महापालिकेने राज्य शासनाकडे हा प्रस्ताव पाठवला. जवळपास १९ वर्षांनंतर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार, पाच गुंठय़ांचे त्रिकोणाकृती क्षेत्र वगळण्यात आले असून तेथे निवासीकरणास मान्यता देण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा