पिंपरी : शहरातील १८ मीटरपेक्षा जास्त रुंदी असलेल्या रस्त्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीने करणाऱ्या ठेकेदाराने किलोमीटर वाढविण्यासाठी रस्ता साफ न करताच रस्ते सफाई वाहन (रोडस्वीपर) पळवल्याचे समोर आल्यानंतर आता आरोग्य विभागाने नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सफाई वाहनाच्या यंत्रणेतही बदल केले जाणार आहेत.
महापालिकेमार्फत शहरातील १८ मीटर रुंदीचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफ केले जातात. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केले आहेत. फेब्रुवारीपासून यांत्रिकी पद्धतीने चार विभागांत काम सुरू असून, त्यासाठी चार संस्था कार्यरत आहेत. प्रत्येक विभागात दोन मोठी, दोन मध्यम रस्ते सफाई वाहने, एक पाण्याचा टँकर अशा वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचे संचलन करण्यासाठी प्रत्येक विभागात ३२ सफाई कर्मचारी, नऊ वाहनचालक, १० ऑपरेटर, चार मदतनीस अशा ५५ कामगारांद्वारे कामकाज करणे अपेक्षित आहे. प्रत्येक रस्ते सफाई वाहनाद्वारे दररोज ४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सफाई करणे आवश्यक आहे. १८ मीटर व त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते, बीआरटीएस, महामार्गावरील पदपथ आणि सेवा रस्त्यांच्या दोन्ही बाजूंची आठवड्यातून तीन वेळा, मुख्य मार्गावरील मधल्या रस्त्यांची, रस्त्याच्या कडेच्या भिंतीच्या परिसराची आठवड्यातून एक वेळा सफाई करणे आवश्यक आहे.
रस्ते सफाई न करता ठेकेदार सफाई वाहन किलोमीटर वाढविण्यासाठी पळवत महापालिकेची तिजोरी साफ करत होते. त्यामुळे महापालिकेने ॲन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग सेल लिमिटेडला पाच, लायन सर्व्हिसेसला चार, रिल वेस्ट मॅनेजमेंट एलएलपीला तीन, तर भूमिका ट्रान्स्पोर्टला दोन नोटिसा बजाविल्या. लायन सर्व्हिसेसला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. भविष्यात असा प्रकार होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने सर्व ठेकेदार प्रतिनिधींची बैठक घेतली. यापुढे चुकीचे काम केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच रस्ते सफाईसंदर्भात नव्याने नियमावली करण्याचा निर्णय घेतला.
यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई करताना ठेकेदार रस्ते सफाई वाहनाच्या ‘ब्रश’चा वापर करत नसल्याचे समोर आले. त्यासाठी रस्ते सफाईबाबत नियमावली तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. ‘ब्रश’चा वापर होतो की नाही, याची पाहणी करण्यासाठी वाहनाच्या यंत्रणेतही बदल केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.