सतत होणारा विजेचा खेळखंडोबा, अघोषित भारनियमन व इतर अनुषंगिक समस्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील लघुउद्योजक कित्येक महिन्यांपासून त्रस्त आहेत. यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी आयोजित बैठकीत उद्योजकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.यावेळी मांडण्यात आलेल्या समस्यांवर उत्तर देताना महावितरणच्या क्षेत्रीय संचालकांनी भोसरी, आकुर्डी, निगडी व पिंपरी विभागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व इतर समस्यांवर एक महिन्यात कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा >>> पिंपरीत गणेश विसर्जनासाठी तीन कृत्रिम हौदांची व्यवस्था ; आसवानी बंधूंचा पुढाकार
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने शहर औद्योगिक परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी महावितरणचे क्षेत्रीय संचालक अंकुश नाळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्यासह जयंत कड, प्रवीण लोंढे, संजय ववले, तात्या सपकाळ, सुरेश म्हेत्रे आदी पदाधिकारी, अनेक लघुउद्योजक व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. या चर्चेदरम्यान औद्योगिक परिसरात महावितरणने चार सबस्टेशन निर्माण करावेत, अशी मागणी यावेळी क्षेत्रीय संचालकाकडे प्रामुख्याने करण्यात आली.
हेही वाचा >>> पुणे : पीएमपी चालकाला बेदम मारहाण ; मुजोर मोटारचालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा
बैठकीत लघुउद्योजकांच्या वतीने समस्यांची जंत्रीच मांडतानाच काही मागण्याही करण्यात आल्या. फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, फिडरच्या वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करावेत, फिडर पिलर मधील खराब झालेले भाग तसेच खराब झालेले दरवाजे बदलण्यात याव्यात, वेगवेगळ्या साईजच्या केबलचा साठा करून ठेवून गरजेच्या वेळी २४ तास उपलब्ध करून द्यावा, केबलचे दुरुस्तीचे वाहन उपलब्ध करून देणे. आवश्यक तेथे नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात यावा. पिंपरी चिंचवड औद्योगिक विभागासाठी मंजूर झालेला महावितरणचा आराखडा कार्यान्वित करावा तसेच नवीन आराखड्यासाठी पाठपुरावा करावा. स्विचिंग स्टेशनची संख्या वाढवावी. भोसरी विभागातील अभियंते व कर्मचारी वाढवावेत, दर महिन्याला आढावा बैठक घ्यावी. थकीत वीज बिलांचे ग्राहकांना सुलभ हप्ते करून द्याव्यात. शक्य तिथे भुयारी केबल टाकावी. वीजपुरवठा खंडीत करण्यापूर्वी वीज ग्राहकाला कल्पना द्यावी, आदी मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे.
महावितरणच्या कारभारावरून तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. या तक्रारीकडे दोन-तीन दिवस कोणीही लक्ष देत नाही, असे सांगत यासंदर्भात उपाययोजना कराव्यात व कायमस्वरूपी कार्यक्षम अधिकारी नेमावेत. पालिका, महावितरण व लघुउद्योग संघटना यांची एक संयुक्त बैठक घेऊन रस्ता खोदाईमुळे येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यात यावा, अशा विविध मागण्या लघुउद्योजकांच्या वतीने क्षेत्रीय संचालाकासमोर मांडण्यात आल्या.