केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवलेआहेत. केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतल्यानंतरही पवार यांनी प्रशासकीय पातळीवर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पिंपरीच्या शिष्टमंडळाने बुधवारी नायडू यांची दिल्लीत भेट घेतली. तेव्हा ‘स्मार्ट सिटी’ साठी पुणे व पिंपरीचा एकत्र प्रस्ताव सादर करणे, ही राज्य सरकारची चूकच होती, असे सांगत पिंपरी पालिकेचे आक्षेप नोंदवून घेऊ आणि शहराचा प्रस्ताव पुन्हा तपासून पाहू, अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली. बैठकीत नायडू यांनी पवारांशी अनेक विषयांवर चर्चा केली. या चर्चेत, पवार पंतप्रधान व्हायला हवेत, अशी भावना नायडूंनी यावेळी व्यक्त केल्याचेही उपस्थितांकडून सांगण्यात येते. बैठकीनंतर पवार दिल्लीतच थांबले. त्यांनी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि स्मार्ट सिटीत समावेश न करून पिंपरी-चिंचवडवर अन्याय झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. पवारांच्या ताब्यात पिंपरी पालिका आहे. दीड वर्षांवर आलेल्या निवडणुकीत ‘स्मार्ट सिटी’चा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे पवारांनी या संदर्भात शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा