पिंपरी : नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने तीन आठवड्यांपूर्वी केलेल्या आत्महत्येचे गुढ उकलण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. ‘गे’ उपयोजनच्या (ॲप) माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर काढलेले छायाचित्र आणि चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागितल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. आरोपी विद्यार्थ्यांनी गे उपयोजनच्या माध्यमातून असेच खंडणी उकळण्याचे प्रकार केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मूळचा राजगुरूनगर येथील असलेला हा विद्यार्थी पिंपरीतील नामांकित महाविद्यालयात एका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. तर, आरोपी असणारे सहा विद्यार्थीही याच महाविद्यालयात वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. सहा जणांपैकी काही जण महाविद्यालयाजवळच एका बंगल्यात भाडेतत्वावर राहतात. या विद्यार्थ्यांची एका गे उपयोजनवरून ओळख झाली. त्यानंतर हे विद्यार्थी एकत्र येऊ लागले.

या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आत्महत्या केलेल्या संबंधित विद्यार्थ्याशी उपयोजनच्या माध्यमातून संपर्क साधला आणि त्याला एका बंगल्यात बोलावून घेतले. तेथे त्याचे ग्रुपमधील एका विद्यार्थ्यासोबत छायाचित्र काढले आणि चित्रीकरण केले. ते छायाचित्र आणि चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्या विद्यार्थ्याकडे ५० हजार रुपये खंडणीची मागणी केली. हा प्रकार कुटुंबीयांना समजू नये, यासाठी विद्यार्थ्याने एका नातेवाईकाकडून ३५ हजार ५०० रुपये घेतले आणि आरोपींना दिले. मात्र, आरोपींनी आणखी पैशांची मागणी करत विद्यार्थ्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

या प्रकारामुळे समाजात आपली बदनामी होईल, या भीतीपोटी विद्यार्थ्याने २४ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. आत्महत्येचे खरे कारण कोणाला समजू नये, यासाठी विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आणि त्यात घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले. पिंपरी पोलिसांच्या तपासात मृत विद्यार्थ्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास केला असता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा हा कारनामा समोर आला.

आरोपी विद्यार्थ्यांनी गे उपयोजनच्या माध्यमातून या विद्यार्थ्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे ‘ब्लॅकमेल’ करून इतरांकडूनही खंडणी उकळली असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले.