पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना (ठाकरे) पक्षाला धक्का बसला आहे. पुणे जिल्हा महिला आघाडीच्या संघटिका, महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांनी समर्थकांसह शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उबाळे यांचे स्वागत केले. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनीषा कायंदे उपस्थित होते.
सुलभा उबाळे यांच्यासोबत ठाकरे गटाचे शहर संघटक संतोष सौदनकर, उपशहर प्रमुख सुधाकर नलावडे, उपविभाग प्रमुख गणेश झीडे, भोसरी विधानसभा संघटिका ॲड. शिल्पा साळवे, विभाग संघटक राजेंद्र पालांडे, भोसरी विधानसभा समन्वयक महिला आघाडी सुजाता काटे, उपशहर संघटिका शशिकला उभे, युवा सेना शहप्रमुख भोसरी विधानसभा अजिंक्य उबाळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अमित शिंदे, प्रसिद्धी प्रमुख भोसरी विधानसभा सार्थक दोषी, युवासेना उपशहर प्रमुख सागर शिंदे, विभाग प्रमुख अनिकेत हेरुणकर, विभाग संघटिका भारती चकवे, महिला उपशहर प्रमुख निर्मला पाटील, विभाग संघटिका लीलावती देवकाते, संगीता टुपके, नजमा शेख, दमयंती गायकवाड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला.
सुलभा उबाळे यांची आक्रमक नेत्या म्हणून ओळख आहे. त्यांनी निगडी, यमुनानगर परिसराचे महापालिकेत प्रतिनिधित्व केले. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या, शिवसेना गटनेत्या म्हणून त्यांनी काम केले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु, शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाचा पराभव झाल्याने त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला.
‘सुलभा उबाळे या आक्रमक नेत्या आहेत. त्यांच्यासोबत मी महापालिका सभागृहात एकत्र काम केले आहे. त्यांचा मोठा अभ्यास आहे. अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केले आहे. शहरात शिवसेना (शिंदे) आणखी मजबूत केली जाणार आहे. संघटना वाढीसाठी उबाळे यांची मोठी मदत होणार’ असल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.