पिंपरी : बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असून, आता लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यावर १६ किलोमीटरचा वळसा मारून पिंपरीत यावे लागत असलेल्या बोपखेलवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोपखेल गावासाठी दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (सीएमई) हद्दीतून जाणारा नागरी रस्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला. त्यामुळे बोपखेल गावातील रहिवाशांना पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करण्यासाठी पूर्वी लागणारे दोन किलोमीटरचे अंतर १६ किलोमीटर झाले. भोसरी किंवा विश्रांतवाडी, खडकी मार्गावरून १६ किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे नागरिकांसह, विद्यार्थी, कामगारांची मोठी गैरसोय होत असल्याने पिंपरी महापालिकेने २० जुलै २०१९ रोजी बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर १८५६ मीटर म्हणजेच दोन किलोमीटर अंतराचा पूल बांधण्याचे काम हाती घेतले.

हेही वाचा – उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार ? जाणून घ्या, कोणत्या भागाला मिळणार दिलासा

पूल व जोड रस्त्याचे काम टी ॲण्ड टी इन्फ्रा कंपनीने केले. न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात येण्यास विलंब आदी कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे कामाला चोवीस महिन्यांची मुदतवाढ दिली होती. पुलाची लांबी १८५६ मीटर तर रुंदी ८.४० मीटर आहे. पोहोच रस्त्यांची लांबी बोपखेलच्या बाजूने ५८ मीटर तर, खडकीच्या बाजूने २६२ मीटर असे बांधकाम करण्यात आले आहे. अखेर चार वर्षांनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पुलाचे लोकार्पण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१६ किलोमीटर अंतर कमी होणार

संरक्षण विभागाच्या आस्थापना, वसाहतीसाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या व मनोऱ्यामुळे पुलाच्या कामास अडथळा निर्माण झाला होता. या वाहिन्या व मनोरे १८ मे २०२४ रोजी स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर स्थापत्यविषयक कामे पूर्ण झाली. या पुलामुळे नागरिकांना २.९ किलोमीटर अंतरावरावरून खडकी कटक मंडळ भागातून पिंपरी-चिंचवड, पुणे शहराकडे ये-जा करण्यास सुलभ होणार आहे. १६ किलोमीटर अंतर कमी होणार आहे. परिणामी, नागरिकांचा वेळ, इंधन खर्च वाचणार आहे.

हेही वाचा – अल्पवयीनाविरुद्ध बाल न्याय मंडळात पोलिसांकडून अहवाल; कल्याणीनगर अपघात प्रकरण

पूल उभारण्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सकारात्मक भूमिका घेतली. संरक्षण विभागाची जागा देण्यास मदत केली. आता पूल वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे माजी स्थानिक नगरसेवक विकास डोळस म्हणाले.

पुलाचे काम पूर्ण झाले आहे. संरक्षण विभागाने सुचविलेले गोदाम, वाहनतळ उभारले आहे. संरक्षण विभागाचे अधिकारी पाहणी करणार आहेत. त्यांच्या पाहणीनंतर पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri the work of bopkhel bridge over mula river is complete after four years pune print news ggy 03 ssb