पिंपरी- चिंचवड: सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट एकने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून १७ लाखांचे तब्बल २९ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. गंगाधर रावसाहेबा तेलशिंगे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सोनसाखळी चोरट्याच्या पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट एकने मुसक्या आवळल्या आहेत. गंगाधर राबसाहेब तेलशिंगे हा मोशीतील भारतमाता चौक परिसरात राहतो. तो के.एस. बी. चौकातील बीआरटी बस स्थानकात संशयितरित्या थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. टी- शर्टमध्ये धारदार वस्तू लपवल्याचेदेखील सांगण्यात आलं. पोलिसांनी तात्काळ तिथे जाऊन त्याला अटक केली.

चौकशीत पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच गंगाधर रावसाहेब तेलशिंगेने त्याच्याकडून १७ लाखांचे २९ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांना दिले. पोलिसांनी ते दागिने जप्त केले आहेत. आरोपी गंगाधर हा बसस्थानक, बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिल्यांच्या गळ्यातली सोन्याचे दागिने लंपास करायचा. आरोपी गंगाधर हा गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करत असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.