पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून तीन महिलांकडून एका २२ वर्षीय तरुणाला मारहाण केली. हाताच्या उजव्या अंगठ्याशेजारील बोटाला चावा घेऊन पुढचा भाग तोडला आणि गंभीर दुखापत केल्याची घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली.
महादेव शरणाप्पा गडदे (वय २२, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन महिलांसह एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महादेव व त्यांचा मित्र हे गप्पा मारत बसले होते. यावेळी आरोपी गाडीतून तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून महादेव यांना ओढत रोडवर नेले. तिथे त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, महादेव यांच्या हाताच्या उजव्या अंगठ्याशेजारील बोटाला चावा घेऊन अक्षरश: पुढचा भाग तोडला आणि गंभीर दुखापत केली.
हे भांडण सोडवण्यासाठी महादेव यांची आई आली असता महादेव यांच्या आईला देखील मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच, पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास सोडणार नाही, अशी धमकी देखील दिली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात तीन महिलासह चौघाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार वरे तपास करीत आहेत.
मोबाईलवरून दोन नातेवाईकांमध्ये हाणामारी
मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून नातेवाईक असलेल्या दोन कुटुंबात लाकडी दांडके व गजाने एकमेकांना मारहाण करण्यात आली. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
तुकाराम गंगाधर गिरी (वय २२, रा. टाकळगाव, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एक महिला आणि एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या घराजवळच आरोपी राहतात. दोघेही नातेवाईक आहेत. लातूर येथून आणलेला मोबाईल मागण्यासाठी फिर्यादी, त्यांची आई व लहान भाऊ हे आरोपीच्या घरी गेले. यावेळी आरोपीने मोबाईल देण्यास नकार दिला. तसेच, फिर्यादी व त्यांच्या आईला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने व लोखंडी पाईपने मारहाण करत दोघांनाही जखमी केले.
तर, महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगाधर गिरी (वय ६०) व ज्ञानेश्वर गिरी (वय १९) यांना अटक केली आहे. तर, एका व्यक्तीसह, तीन महिलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे जुन्या भांडणाच्या कारणावरून घरात घुसले व त्यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडके व लोखंडी गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.