पिंपरी : आषाढी वारीकरिता श्री क्षेत्र अलंकापुरीत वैष्णव दाखल झाले आहेत. राज्य-परराज्यातील वैष्णवजनांनी इंद्रायणी नदीकाठी पवित्र स्नानाकरिता गुरुवारी सकाळी मोठी गर्दी केली होती. अलंकापुरीतील मठ, धर्मशाळा व राहुट्यामधून हे वैष्णव हरिनामाचा गजर करत आहेत. वडिवळे आणि आंद्रा धरणातून पाणी सोडून नदी स्वच्छ करण्यात आली आहे.

आषाढी वारीसाठी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी, भाविक आणि दिंड्या आळंदीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान शनिवारी देऊळवाड्यातून होणार आहे. मंदिरातून प्रस्थान आणि पहिल्या मुक्कामातील पाहूणचार घेतल्यानंतर ३० जून रोजी श्रींचा पालखी सोहळा पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्थ होतो.

हेही वाचा – पुणेकरांना खुषखबर! गणेशोत्सवात मेट्रोची स्वारगेटपर्यंत धाव

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तोंडावर आळंदी येथील इंद्रायणी नदीतील पाण्यावर जलप्रदूषण, रसायनमिश्रित पाण्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) आला होता. वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपरिषदेने विविध उपाययोजना हाती घेतल्या. पाटबंधारे विभागाला विनंती करून इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यास सांगितले. पाण्याच्या प्रवाहामुळे नदीतील तवंग वाहून गेला. नदी स्वच्छ दिसत असल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा – सावधान! पुण्यात झिकाचा धोका आणखी वाढला; जाणून घ्या कोणत्या भागात आढळले रुग्ण…

आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले की, वडिवळे आणि आंद्रा धरणातून १९ जून रोजी शंभर क्यूसेक वेगाने इंद्रायणी नदीत पाणी सोडले होते. हे पाणी मंगळवारी आळंदीतील पात्रापर्यंत आले. पाण्याच्या प्रवाहामुळे नदीतील तवंग वाहून गेला आहे. नदी स्वच्छ आणि सुंदर झाली आहे.