पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाला उमेदवारी मिळाल्याने उद्धव ठाकरे गट नाराज झाला आहे. शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत – धर यांचं काम न करण्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. यावर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुलक्षणा शिलवंत- धर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व नाराज शिवसैनिकांना एकत्र आणून मी काम करणार आहे. त्यांची समजूत काढणार आहे. मगच पुढे जाईल असा विश्वास सुलक्षणा शिलवंत- धर यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – गवार, कोबी, वांगी, मटार महाग
हेही वाचा – पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट की शरद पवार गट यांच्यापैकी कुठल्या पक्षातील इच्छुकाला उमेदवारी मिळणार यावरून तर्क वितर्क लावले जात होते. दोन्ही पक्षातून ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि शरद पवार गटाच्या नेत्या सुलक्षणा शीलवंत- धर हे सर्व इच्छुक होते. अखेर तिसऱ्या यादीत शीलवंत यांचं नाव जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त करत त्यांचं काम न करण्याची भूमिका घेतली होती. यावर सुलक्षणा शीलवंत- धर यांनी त्यांचं मत व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलयानुसार ही जागा आम्हाला देण्यात आली आहे. सर्वेमध्ये नाव असल्याने मला उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्या पुढे महायुतीचे आव्हान आहे. शिवसैनिक स्वतःचा विचार न करता महायुतीला पराभूत करण्यासाठी एकत्र येतील. नाराज इच्छुकांची भेट घेणार असून समजूत काढणार आहे, असं शिलवंत यांनी म्हटलं आहे.