पिंपरी : महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्याकरिता ‘मी जबाबदार करदाता’ रील-रॅप-गाणे बनवा, स्पर्धेचे आयोजन केले आहे. समाजमाध्यमातून नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असून रिल्स बनविणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालमत्ता कर वसूल करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. थकीत रकमेवर प्रति महिना दोन टक्क्यांचा विलंब दंडही वाढत आहे. ज्या मालमत्ताधारकांनी पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही, अशा मालमत्तांचे नळजोड खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी कर भरण्यासाठी रील, गाणे व रॅपच्या माध्यमातून आवाहन केले जाणार आहे. यासाठी ‘मी जबाबदार करदाता’ रील-रॅप-गाणे बनवा, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रील, गाणे, रॅप व्हिडिओ स्वनिर्मित असावा. इतरांच्या व्हिडीओमधील कोणताही भाग घेऊ नये. रील व्हिडिओ ६० ते ९० सेकंदांचा असावा. समाजमाध्यमावर किमान दोन हजारांवर (पाठीराखे) फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. रील्स स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणी अर्ज महापालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही स्पर्धा १ ते १५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होईल. स्पर्धकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत रील पोस्ट करून इन्स्टाग्रामवरील @pcmc_pimprichinchwad या खात्याला ‘कोलॅब’ करावे. फेसबुक व एक्स या व्यासपीठावर पोस्ट केल्यास फेसबुक @Pimpri Chinchwad Municipal Corporation व एक्सच्या @pcmcindiagovin या सोशल मीडिया हँडलला टॅग करावे. त्याची लिंक ptax@pcmcindia.gov.in या इ-मेलवर पाठवावी. रील, गाणे व रॅप यांचे दृश्य, आवाज स्पष्ट ऐकू व दिसेल, असा त्याचा दर्जा उत्तम असावा. रील्स स्पर्धेचा निकाल हा रील्सचे लाईक, दर्शकसंख्या (व्ह्यूव्ह्स), आशय, मांडणी, विषयाला दिलेला न्याय आदीवर ठरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास ५० हजार, द्वितीय ३० हजार आणि तृतीय क्रमांक येणाऱ्याला २० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

मालमत्ता कर भरायची करा घाई, नाही तर होईल जप्तीची धडक कारवाई, पाणीपट्टी आजच भरा, नळजोड खंडित होण्याची कारवाई टाळा, तुमचा थकला आहे, मालमत्ता कर? त्यावर वाढतोय विलंब दंड, शहराच्या विकासात हातभार लावण्यासाठी मालमत्ता कराचा भरणा करा, या विषयावर रील्स, रॅप करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांंभळे यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimprichnchwad municipal corporations taxation and collection department is hosting me jababdar kardata rap contest to encourage property tax payments pune print news ggy 03 sud 02