पुणे : ‘पिंक ई- रिक्षा’ सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून या सेवेला पूरक सेवेचा (फिडर सर्व्हिस) दर्जा देण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनला (महामेट्रो) पूरक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाशी करार केला जाणार असून राज्यातील सर्व विमानतळे आणि पर्यटन स्थळांवरही ही सुविधा पुरविली जाणार आहे.’ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागाच्यावतीने जिल्ह्यातील चार हजार महिलांना पिंक ई- रिक्षाचे वितरण कृषी महाविद्यालय येथे करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते. कार्यक्रमाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, विभागाचे सचिव डाॅ. अनुपकुमार यादव, विभागाच्या आयुक्त नयना गुंडे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील ६० लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
पवार म्हणाले, ‘महिला सक्षमीकरण आणि सुरक्षिततेच्यादृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून महिलांना रोजगार निर्मिती, आर्थिक सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, नाशिक, नागपूर, अहल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि कोल्हापूर या आठ शहरांत दहा हजार रिक्षा वितरित करण्यात येणार आहेत.’
‘पुण्यातील मेट्रोला पूरक सेवा उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा करण्यात आली असून, त्यांच्याकडून करारासाठी सहमती दर्शविण्यात आली आहे. या योजनेला महिलांकडूनही चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. प्रतिसाद मिळाल्यास अन्य जिल्ह्यांतील लोकसंख्येचा विचार करून पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल.’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
‘पिंक ई- रिक्षा योजनेमुळे पुरुषांचा रोजगार बुडणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. त्यादृष्टीने या योजनेचा टप्प्याटप्प्याने प्रसार करण्यात येईल.’ असे पवार म्हणाले.
‘महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या पाठिशी आहे. काही जण ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बंद करणार, संविधान बदलणार असा अपप्रचार करत आहेत. मात्र, राज्यातील लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये सन्मान निधी दिला जातो. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थी महिलांचा सन्मान निधी बंद होऊ दिला जाणार नाही.‘ असे पवार यांनी सांगितले.
‘रिक्षात पुरुष प्रवासी बसल्यास फोटो काढा’
सुरक्षिततेसाठी महिला ग्राहकांनी रिक्षाने जाताना ‘पिंक ई- रिक्षाला प्राधान्य द्यावे. रिक्षाचालक महिलांनी त्यांच्या रिक्षात ग्राहक म्हणून पुरुष बसल्यास त्यांचे फोटो काढून घरी पाठवावे. यातून सुरक्षितता आणि समाजातील विकृतींना आळा बसेल. पोलीस यंत्रणेलाही याचा उपयोग होईल. परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून या निर्णयाबाबत लवकरच परिपत्रक काढण्यात येईल.’ असे पवार यांनी सांगितले.