पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला शिवाजीनगर पोलिसांनी नदीपात्रातील रस्त्यावर पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. अंबाजी कल्याणी शिंगे (वय २४, रा. ससाणे नगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.
शिंगेविरुद्ध वानवडी, मुंढवा, हडपसर भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. नदीपात्र परिसरातील नाना-नानी पार्कजवळ एक जण थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शिंगेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय पांढरे, कैलास दाबेराव,सचिन जाधव, दीपक चव्हाण, अतुल साठे यांनी ही कारवाई केली. शिंगे याने पिस्तूल कोठून आणले, तसेच त्याने पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा – शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. देशी बनावटीचे पिस्तूले मध्य प्रदेशातून आणून त्याची विक्री गुंडांना केली जाते. अनेक गंभीर गुन्ह्यात देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर केला जातो. मध्य प्रदेशातील उमरठी भागात स्थानिक कारागीर देशी बनावटीची पिस्तूले तयार करतात. तेथून महाराष्ट्रात पिस्तुले विक्रीस पाठविली जातात. मध्यस्थ सराइतांना पिस्तुलांची विक्री करतात. एका पिस्तुलाची किंमत साधारणपणे २० ते २५ हजार रुपये असते. गुंडांना सहज पिस्तूल उपलब्ध होते. अनेक जण समाजात प्रभाव पाडण्यासाठी पिस्तूल बाळगतात.