लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) केलेल्या कारवाईत जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडलेल्या गुंडाकडून गुन्हे शाखेने पिस्तुलासह काडतूस जप्त केले. लोणी काळभोर भागात ही कारवाई करण्यात आली.

अनिकेत गुलाब यादव (वय २२, रा. सोपाननगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यादव याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांकडू महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली होती. त्यानंतर यादव येरवडा कारागृहात होता. न्यायालयाकडून त्याने जामीन मिळविला. त्यानंतर तो कारागृहातून बाहेर पडला. यादव याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी बाळासाहेब सकटे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे यांनी ही कारवाई केली.

मकोका कारवाईत जामीन मिळालेले सातशे सराइत कारागृहातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. गुन्हे शाखेने जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंडाची यादी तयार केली आहे.

Story img Loader