पिंपरी- पिंपरी- चिंचवडमध्ये झालेल्या सोन्या तापकीर हत्याप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. सोन्या तापकीरच्या हत्येसाठी अल्पवयीन मुलांना पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण देऊन ही हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात उजेडात आलं आहे. याप्रकरणी गुंडाविरोधी पथकाने परराज्यातून मास्टरमाइंड करण रतन रोकडे, ऋत्विक उर्फ मुंग्या रतन रोकडे आणि रिंकू दिनेश कुमार याला बेड्या ठोकल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे यात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं समोर आलेल आहे.
पिंपरी- चिंचवडमधील चिखली परिसरामध्ये पूर्ववैमनस्यातून सोन्या तापकीर याची एका अल्पवयीन मुलासह सोन्या पानसरे याने गोळ्या झाडून भर दिवसा हत्या केली होती. या प्रकरणी आतापर्यंत अकरा जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या हत्येमागील मास्टरमाइंड करण रतन रोकडे हा फरार होता. मास्टरमाइंड करण रतन रोकडे याच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध चिखली पोलीस आणि गुंडाविरोधी पथक घेत होतं. गुंडाविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक हरीश माने यांच्या टीमला माहिती मिळाली की, करण रतन रोकडे साथीदारांसह उत्तर प्रदेश येथे वास्तव्यास आहे. करण रतन रोकडे, ऋत्विक उर्फ मुंग्या रतन रोकडे, रिंकू दिनेश कुमार आणि अल्पवयीन मुलगा एकाच इमारतीत वास्तव्यास होते. तिथं पोलिस येत असल्याचं बघताच त्यांनी पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुंडाविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या टीमने फिल्मी स्टाईल पाठलाग करून चारही जणांना पकडले. या हत्येप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे ज्या अल्पवयीन मुलांचा या गुन्ह्यात सहभाग आहे. त्यांना पिस्तूल चालवण्याचं प्रशिक्षण चिखलीतील बैलगाडा घाटात देण्यात आलं. अल्पवयीन मुलांच्या पाठीमागे राहून करण रतन रोकडे यांने ही हत्या घडवून आणल्याचं उजेडात आलं आहे.
आणखी वाचा-कोंढव्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेचा छापा, एक संशयित ताब्यात
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक हरीश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुनील चौधरी, नितीन गेंगजे, श्याम बाबा, विजय तेलेवार, मयूर दळवी, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वरी गिरी, तौफिक शेख, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या टीमने केली आहे.