पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय असतानाच पिस्तूल विक्रीचा ‘उद्योग’ तेजीत असल्याचे पुन्हा उघड झाले. पिंपरी पोलिसांनी सात देशी बनावटीची पिस्तुलं व ३३ जिवंत काडतुसे पकडण्याची कामगिरी केली. शहराचे क्षेत्र वाढले व लोकसंख्या वाढल्याने गुन्हेगारी वाढल्याचा युक्तिवाद पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
चिंचवडच्या ऑटो क्लस्टर परिसरात बेकायदेशीरपणे पिस्तूल विकण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती हवालदार शाकीर जिनेडी यांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून आरोपींना गजाआड करण्यात आले. संतोष विलास मोरे (वय-३३. वडगाव धायरी), सुनील अनंता पिसाळ (वय-२९, गव्हाणे वस्ती, भोसरी) आणि गणेश किरण खानापुरे (वय-२६, गुरूवार पेठ, पुणे) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सहा देशी बनावटीची पिस्तुले व ३० जिवंत काडतुसे असा सहा लाखाचा माल जप्त करण्यात आला. दोन दिवसापूर्वी संतोष मोरेने खानापुरे यास पिस्तूल विकले होते. त्यास ताब्यात घेऊन एक देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. यासंदर्भात उपायुक्त माने म्हणाले, की पिंपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. मोदीराज व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. टोळीयुध्दाशी त्यांचा संबंध आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येईल. तथापि, माथाडी नेता प्रकाश चव्हाणच्या हत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना पोलीस उपायुक्तांनी बगल दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा