कोणताही कला मी धर्मविधी समजतो. त्यामुळे नाटक हा माझ्यासाठी धर्मविधी आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार महेश एलकुंचवार यांनी रविवारी व्यक्त केले. खऱ्याखुऱ्या गंभीरपणे नाटक करता आले पाहिजे आणि रसिकांनाही ते पाहता आले पाहिजे. यामध्ये रसिकांवरही मोठी जबाबदारी आहे. मूळ धर्मविधी असलेल्या नाटकाचा प्रवास आज रंजनाकडे झाला आहे, असे भाष्य त्यांनी केले.
आशय सांस्कृतिक आणि पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्यातर्फे आयोजित ‘पुलोत्सवा’मध्ये ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते एलकुंचवार यांना ‘पुल स्मृती सन्मान’ प्रदान करण्यात आला. पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे सतीश कुबेर, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जताकदार या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात संजय आर्वीकर यांनी एलकुंचवार यांची मुलाखत घेतली.
एलकुंचवार म्हणाले, बहुतांश लेखक आणि चित्रकार यांना आपण संगीतकार व्हावे असे वाटते. संगीत जेथे पोहोचते, तेथे माध्यमांच्या कुबडय़ांनी पोहोचता येत नाही. संगीताचा अनुभव हा शब्दातीत आहे. त्याची व्याख्या करता येत नाही. ही किमया साधणे लेखकाला शक्य होत नाही. हा अनुभवाचा प्रदेश बुद्धीपल्याडचा आणि संवेदनांचा आहे. बुद्धीची मर्यादा संपून अनुभवाचा प्रदेश सुरू होतो, तेथे लेखक कसा पोहोचणार. ग्रेससारख्यालाही एका कवितेत ते साध्य होते. कलावंताच्या आयुष्यात उन्नयानाचे क्षण कमीच येतात. एरवी तो सामान्य माणूसच असतो. साहित्यिक नाटक आणि प्रयोगमूल्य नाटक असे विभाजन हेच घोटाळ्याचे वाटते. ज्या संहितेला प्रयोगमूल्य आहे, त्याला साहित्यमूल्य असतेच.
रवी परांजपे म्हणाले, समान नागरी संस्कृती आणि सभ्यता याचा अभाव असल्यामुळे सार्वजनिक, राजकीय, सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावर दुष्परिणाम दिसतात. एवढेच नव्हे तर सौंदर्यदृष्टीचा अभाव दिसतो.

पुलंच्या विनोदामागे साधना
पुलंच्या आठवणींना उजाळा देताना एलकुंचवार म्हणाले, पुलंच्या विनोदामागे मोठी साधना होती. ज्ञानपरंपरेचे सत्त्व त्यांनी आपल्यामध्ये पचवले आणि मुरवले होते. त्यांच्यातील ‘परफॉर्मर’ पाहताना त्या विनोदी मुखवटय़ामागे विद्वान माणूस आहे हे आमच्या ध्यानातच आले नाही. परंपरेचे आणि अभिजाततेचे सगळे बळ घेऊन त्यांचे साहित्य अवतरले आहे. विनोदासाठी फार मोठी एकांत साधना आणि रियाझ करावा लागतो. सध्या सर्वच विषयातील अभ्यास कमी पडत असल्यामुळे विनोदी लेखन पोकळ वाटते. विनोदाचे नाणे खणखणीत वाजतच नाही.