पुणे व मुंबई या शहरांना जोडणारी ईएमयू लोकलची सेवा सुरू करण्याची योजना मध्य रेल्वेकडून आखण्यात आली असून, शिवाजीनगर ते कुर्ला या मार्गावर ही लोकल सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने या प्रकल्पाच्या दृष्टीने सध्या तांत्रिक चाचणीही सुरू केली आहे.
शिवाजीनगर ते कुर्ला या दरम्यान येणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकावरील प्रवाशांची गरज लक्षात घेता ही सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर या सेवेची आखणी करण्यात येत असून, त्यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींबाबत मध्य रेल्वेच्या वतीने रेल्वे बोर्डामध्ये परवानगी मागण्यात आली आहे. शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, लोणावळा, कर्जत, पनवेल, बेलापूर, वाशी, चेंबूर, कुर्ला या मार्गाचे या सेवेसाठी नियोजन करण्यात आले असून, या स्थानकावरील प्रवाशांना वेगवेगळय़ा स्थानकावर पोहोचण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
शिवाजीनगर ते कुर्ला ही लोकल सेवा सुरू करण्यासाठी लोकलच्या स्वतंत्र युनिटची मागणीही रेल्वे बोर्डाकडे नोंदविण्यात आली आहे. १२ डब्यांचे हे युनिट असणार आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी पनवेलजवळ मेन व हर्बर या दोन लाइन जोडाव्या लागणार आहेत. हे काम रेल्वेच्या अखत्यारित असल्याने ते पूर्ण होऊ शकते. १२ डब्यांच्या लोकलच्या युनिटला इंजिनचे चार डबे असतात. मात्र, खंडाळा घाट चढण्यासाठी आणखी दोन इंजिनची गरज लागणार आहे. त्याचप्रमाणे शिवाजीनगर ते कुर्ला हे अंतर सुमारे १८० किलोमीटर आहे. रेल्वेच्या नियमानुसार १६० किलोमीटर अंतराच्या पुढे रेल्वेमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था असणे गरजेचे असते. मात्र या विशेष सेवेसाठी या नियमातून सूट देण्याची मागणीही रेल्वे बोर्डाकडे करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सेवा सुरू झाल्यास दिवसातून दोन ते तीन फेऱ्या सुरू होऊ शकतात. आणखी फेऱ्यांसाठी मात्र अधिक युनिट व लोहमार्गाचे विस्तारीकरण करावे लागले, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plan for pune mumbai local train
Show comments