पुणे शहराला पाणीपुरठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन पुढील नियोजनाबद्दल कालवा समितीची बैठक शनिवारी होत असून समितीच्या बैठकीत पुणे शहराला किती पाणी उपलब्ध होणार आहे त्याची माहिती मिळेल. त्यानुसार पुढील आठवडय़ात शहरातील प्रत्येक प्रभागाचा पाणीपुरवठा आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी पालिका सभेत दिली.
धरणांमध्ये झालेला निम्मा पाणीसाठा आणि लांबलेला पाऊस यांचा विचार करून शहराच्या पाणीपुरवठय़ाबद्दल काय नियोजन करण्यात आले आहे, असा प्रश्न विरोधी पक्षनेता व काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी सर्वसाधारण सभा सुरू होताच गुरुवारी उपस्थित केला. त्यानंतर या विषयावर उपमहापौर आबा बागूल, किशोर शिंदे, सचिन भगत, सुभाष जगताप, वसंत मोरे, बाबुराव चांदेरे, राजू पवार, आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे, मुक्ता टिळक, सभागृहनेता शंकर केमसे यांची भाषणे झाली.
या भाषणांनंतर आयुक्तांनी सभेत सविस्तर निवेदन केले. सध्याचा पाणीसाठा लक्षात घेऊन शहराला व शेतीला पुढील काळात किती पाणी दिले जाणार आहे याबाबत कालवा समितीच्या बैठकीत शनिवारी चर्चा व निर्णय होईल. ही निश्चित माहिती समजल्यानंतर पाणीवितरणाचे प्रभागनिहाय नियोजन केले जाईल. बांधकामांमध्ये पिण्याचे पाणी वापरले जात असेल तर ते बंद केले जाईल तसेच बांधकामांमध्ये पिण्याचे पाणी वापरले जात असेल, तर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. शहरात जेथे अनधिकृत नळजोड असतील तेथेही कारवाई केली जाणार असून गाडय़ा धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर जेथे होत असेल, तेथे तो वापर बंद केला जाईल तसेच अशा प्रकारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. जलतरण तलावातील पाण्याच्या वापराबाबतही निर्णय घेतला जाणार असून खासगी टँकर ताब्यात घेऊन ते वितरित करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
पाणी किती उपलब्ध होणार आहे हे समजल्यानंतर पाणीवाटपाचा प्रभागनिहाय आराखडा तयार केला जाईल. त्यासाठी स्थानिक नगरसेवकांबरोबर बैठका घेऊन त्यांच्याही सूचना विचारात घेतल्या जातील. सुरुवातीला १५ सप्टेंबपर्यंतच्या कार्यवाहीबाबत निर्णय घेतले जातील व त्यानंतर परिस्थितीनुसार पुढील निर्णय केले जातील, अशीही माहिती आयुक्तांनी सभेत दिली.
सभेत बोलताना उपमहापौर बागूल यांनी धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन कृती आराखडा केला जावा, अशी मागणी केली. तर पाण्याचा तात्पुरता नको तर दीर्घकालीन विचार केला जावा, अशी सूचना मुक्ता टिळक यांनी केली. पाण्याची गळती थांबवणे, टाक्यांना लेव्हल इंडिकेटर बसवणे या आणि अशा अनेक उपाययोजना शहरात करणे आवश्यक असल्याचा मुद्दा वसंत मोरे यांनी मांडला. पाण्याच्या वापराबद्दल नागरिकांना सूचना देणे आवश्यक असून ते काम प्रशासनाने तातडीने करावे, अशी सूचना सुभाष जगताप यांनी केली.

Story img Loader